गोव्याला एआय आधारित रोग निदानाचे हब करणार : विश्वजीत राणे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्याला एआय आधारित रोग निदानाचे हब करणार : विश्वजीत राणे

पणजी : गोव्यात (Goa) फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर केला जात आहे.  यामुळे आजाराचे लवकर निदान आणि त्वरीत उपचार उपचार सुरू करणे शक्य झाले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. भविष्यात अन्य आजारांसाठी देखील असे तंत्रज्ञान वापरून गोव्याला एआय आधारित रोग निदानाचे हब बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे आरोग्य मंत्री (Health Minister) विश्वजीत राणे यांनी सांगितले. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणे यांनी सांगितले की, राज्यात क्यूअर एआय तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत १ लाखहून अधिक छातीच्या एक्सरेंचे  विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १६०० संशयित असून २० जणांना फुफ्फूसाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू झाले आहेत. फुफ्फूसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. उशीरा निदान झाल्याने उपचार देखील वेळाने सुरू होतात. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र आता एआय तंत्रज्ञानाद्वारे त्वरित निदान करणे शक्य झाले आहे. ते म्हणाले, सामान्य प्रक्रियेच्या तुलनेत एआयद्वारे निदान करण्यास पन्नास टक्के हून कमी कालावधी लागत आहे. सध्या ही सुविधा १७ आरोग्य केंद्र, इस्पितळ तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. लवकरच राज्यात सर्वत्र अशी सुविधा सुरू करण्याचा आमचा विचार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत २ लाख रुग्णांचे निदान करण्यात येईल. राज्यातील अन्य आरोग्य केंद्रांतील सर्व छातीच्या एक्स रेंचे एआय स्कॅनिंग करणे आवश्यक करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. 

कर्करोग इस्पितळ २०२७ मध्ये सुरू करणार

राणे यांनी सांगितले की, टर्शेरी कर्करोग इस्पितळ पूर्णत्वाकडे आले असून ते २०२७ संपण्यापूर्वी सुरू केले जाईल. इस्पितळ टाटा मेमोरियल सोबत काम करेल. येथे अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाची यंत्रसामग्री वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा