जनहित याचिका दाखल : २५ फेब्रुवारीला सुनावणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भटकी कुत्री, मोकाट जनावरे यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, तसेच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर २५ फेब्रुवारी राेजी सुनावणी होणार आहे.
इंंद्रेश अडवाणी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत गोवा सरकार, पशुसंवर्धन खात्याचे संंचालक, पशुकल्याण मंंडळ आणि सदस्य सचिव, गोवा राज्य पशुकल्याण मंंडळ यांना प्रतिवादी केले आहे. भटकी कुत्री, मोकाट गुरे तसेच अन्य बेवारस जनावरांंची सुरक्षा तसेच आरोग्यासाठी विविध कायदे आहेत. राज्यघटनेतही त्यांना आवश्यकते उपाय करण्याबाबत तरतूद आहे. गोव्यात मात्र भटकी कुत्री, मोकाट जनावरे तसेच अन्य बेवारस प्राण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मृत्यूनंतर त्यांच्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यांचा मृतदेह बेवारस स्थितीत पडून राहतो. भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांसाठी प्रत्येक तालुक्यात एक स्मशानभूमी असावी. स्मशानभूमीची संख्या आवश्यकतेप्रमाणे असावी. मात्र किमान एक तरी स्मशानभूमी हवीच. बऱ्याच वेळा भटकी कुत्री, मोकाट जनावरे अपघातात जखमी होतात. ती आजारी पडतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी २४ तास रुग्णवाहिका कार्यरत असावी. राज्यात कमीत कमी अशा चार रुग्णवाहिकांची गरज आहे. स्मशानभूमी स्थापन करण्याचे आदेश पशुसंवर्धन खात्याला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.
आजारी जनावरांच्या राहण्याची व्यवस्था करा
भटकी कुत्री, मोकाट जनावरे आजारी पडल्यास त्यांना उपचार करताना त्यांना राहण्यासाठी अभयारण्य किंवा विशेष जागेची व्यवस्था करावी. संंबंंधित सरकारी खात्यांंचे मोकाट गुरे व भटकी कुत्री यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणीही या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.