बिट्स पिलानी पुन्हा हादरले : २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

डिसेंबर २०२४ पासून सहावा बळी : मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd February, 11:03 pm
बिट्स पिलानी पुन्हा हादरले : २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

वास्को/ मडगाव : सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी जितेश या २० वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी (दि. १) गळफास घेऊन आत्महत्या केली. डिसेंबर २०२४ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही सहावी घटना आहे. यापूर्वी पाच विद्यार्थ्यांनी विविध कारणास्तव जीव गमावले होते, मात्र विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

मूळची बंगळुरू-कर्नाटक येथील असलेली वैष्णवी बिट्स पिलानीमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग’च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. रविवारी सायंकाळी ती जेवणासाठी बाहेर न आल्याने मैत्रिणींनी व्हेंटिलेशनमधून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्वरित वेर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

कॅम्पसमध्ये मृत्यूची मालिका (डिसेंबर २०२४ ते २०२६)

या कॅम्पसमध्ये गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंतच्या घटनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

कालावधी विद्यार्थी कारण/स्थिती
डिसेंबर २०२४ ओम प्रियान सिंग आत्महत्या
मार्च २०२५ अथर्व देसाई आत्महत्या
मे २०२५ कृष्णा कासेरा आत्महत्या (संशयास्पद)
ऑगस्ट २०२५ कुशाग्र जैन होस्टेलमध्ये मृतावस्थेत आढळला
४ सप्टेंबर २०२५ ऋषी नायर तणावामुळे मृत्यू
२ फेब्रुवारी २०२६ वैष्णवी जितेश आत्महत्या

समुपदेशनाचा अभाव आणि दुर्लक्ष

बिट्स पिलानी संस्थेत आत्महत्या केलेली वैष्णवी वर्षभरापूर्वीच नैराश्यात गेली होती, अशी माहिती समोर आली आहे. पालकांनी गावी नेऊन उपचार केल्यानंतर तिला पुन्हा संस्थेत सोडले होते. मात्र, परतल्यानंतर संस्थेकडून तिचे एकदाही समुपदेशन करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीची मानसिक स्थिती नाजूक असतानाही संस्थेने तिच्याकडे विशेष लक्ष दिले नाही.

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार ‘दक्षिण गोवा जिल्हा देखरेख समिती’ने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. संस्थेने सीसीटीव्ही सारख्या भौतिक सुविधांची अंमलबजावणी केली असली तरी, त्याचा प्रत्यक्ष फायदा नैराश्यात गेलेल्या मुलांना होत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

#BITSPilaniGoa #StudentSuicide #MentalHealthAwareness #GoaNews #VernaPolice #CampusSafety
हेही वाचा