पुढील ५ वर्षांत १८ पोलीस अधीक्षक होणार निवृत्त

उपअधीक्षकांची ५९ पदे रिक्त : वेळीच भरती​ न केल्यास अधिकाऱ्यांची जाणवणार कमतरता

Story: प्रसाद शेट काणकोणकर। गोवन वार्ता |
02nd February, 10:08 pm
पुढील ५ वर्षांत १८ पोलीस अधीक्षक होणार निवृत्त

पणजी : पोलीस खात्यात अधीक्षक आणि उपअधीक्षक अशा वरिष्ठ श्रेणीतील १०० मंजूर पदांपैकी तब्बल ५९ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या केवळ ४१ पदे भरलेली असून, कार्यरत असलेल्यांपैकी १८ अधीक्षक पुढील पाच वर्षांत निवृत्त होणार आहेत. यामुळे भविष्यात पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी चणचण भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलिकडेच १९ अधिकाऱ्यांना अधीक्षकपदी बढती देण्यात आल्याने सद्यस्थितीत अधीक्षकांची (SP) ३० पदे पूर्ण भरलेली आहेत. मात्र, यामुळे कनिष्ठ स्तरावर मोठी पोकळी निर्माण झाली असून प्रशासकीय कामावर ताण येण्याची शक्यता आहे.

पोलीस दलातील वरिष्ठ पदांची स्थिती

पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत / रिक्त
पोलीस अधीक्षक (SP) ३० ३० (पूर्ण भरलेली)
उपअधीक्षक (DySP) ७० ११ कार्यरत (५९ रिक्त)

निवृत्तीचे संकट (२०२६-२०२९)

पुढील पाच वर्षांत १८ वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरणे आणि पात्र अधिकाऱ्यांना बढती देणे आवश्यक बनले आहे. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

अधिकारी नाव निवृत्ती तारीख
विल्सन्स डिसोझा, संतोष देसाई, सलीम शेख २०२६ दरम्यान
फ्रोन्सिस कॉर्त, रॉय परेरा, सुचेता देसाई, प्रबोध शिरवईकर २०२७ दरम्यान
ब्राझ मिनेझीस, राजेंद्र राऊत देसाई, हरिश्चंद्र मडकईकर, गुरुदास गावडे २०२७ दरम्यान
न. रापोझ, नूतन वेर्णेकर, एझिल्डा डिसोझा, किरण पौडवाल, सुनीता सावंत, धर्मेश आंगले २०२८ दरम्यान
राजन निगळ्ये ३१ ऑक्टोबर २०२९

न्यायालयीन आदेश आणि पदोन्नतीचा पेच

२००२ मध्ये भरती झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची ज्येष्ठता यादी २०१३ पासून तयार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून पदोन्नती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून रिक्त असलेल्या ५९ उपअधीक्षक पदांचा प्रश्न मार्गी लागेल.

#GoaPolice #PolicePromotion #DySPVacancy #GoaNews #HomeDepartmentGoa #PoliceRetirement
हेही वाचा