राज्यात दररोज एका महिलेला कर्करोगाचे निदान

आज जागतिक कर्करोग दिवस : महिन्याला सरासरी १४ महिलांचा मृत्यू

Story: पिनाक कल्लोळी |
4 hours ago
राज्यात दररोज एका महिलेला कर्करोगाचे निदान

गोवन वार्ता
पणजी : मागील काही वर्षांत राज्यात कर्करोगाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. राज्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत १,८२५ महिलांना स्तन किंवा गर्भाशयाचे मुख किंवा बीजांडकोशाच्या (ओव्हरी) कर्करोगाचे निदान झाले आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ३६५, महिन्याला सरासरी ३० म्हणजेच दिवसाला सरासरी एका महिलेला कर्करोगाचे निदान झाले आहे. या काळात ८५४ रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच महिन्याला सरासरी १४ महिला रुग्णांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत राज्यात गर्भाशय आणि बीजांडकोशाच्या तुलनेत स्तनांच्या कर्करोगाच्या रुग्णांचे व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. राज्यात स्तनाच्या कर्करोगाचे २०२१ मध्ये २५३ रुग्ण आढळले होते आणि १०९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये २६० रुग्ण आढळले होते, ११२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये २६८ रुग्ण आढळले होते, तर ११५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये २७६ रुग्ण आढळले होते, तर ११९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२५ मध्ये २७८ रुग्ण आढळले होते आणि १२० रुग्णांचा मृत्यू झाला होता.
राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान २७६ रुग्णांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. यादरम्यान १४९ रुग्णांचा मृत्यू झाला. वर्षनिहाय पाहता २०२१ मध्ये ५८, २०२२ मध्ये ५६, २०२३ मध्ये ५५, २०२४ मध्ये ५३, तर २०२५ मध्ये ५४ महिलांना या प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले होते. २०२१ मध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या ३१ महिलांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये ३०, २०२३ मध्ये ३०, २०२४ मध्ये २९, तर २०२५ मध्ये २९ महिलांचा मृत्यू झाला.
संपूर्ण देशाची आकडेवारी पाहता, वरील कालावधीत ११.४२ लाख महिलांना स्तनांच्या, ३.९० लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा, तर २.३७ लाख महिलांना ओव्हरीचा कर्करोग झाला होता. पाच वर्षांत देशात स्तनांचा कर्करोग झालेल्या ४.९१ महिलांचा मृत्यू झाला, तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या २.१० लाख व ओव्हरी कर्करोग झालेल्या १.४५ लाख महिलांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रमध्ये कर्करोग निदान तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तर अरुणाचल प्रदेश, मेघालयात हे प्रमाण अत्यल्प होते.
ओव्हरी कर्करोगाचे २१४ रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान ओव्हरी कर्करोगाचे २१४ रुग्ण आढळले. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ४२, म्हणजेच महिन्याला सरासरी ३ रुग्ण आढळले. वरील कालावधीत ओव्हरी कर्करोग झालेल्या १३० महिलांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा