काणकोण पोलिसांची कारवाई : ५.२५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

काणकोण : देवबाग फुटबॉल मैदानावर छापा टाकून काणकोण पोलिसांनी ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी शॅक चालक वॉल्टर फर्नांडिस (४९, रा. चापोली-काणकोण, मूळ कोचीन-केरळ) याला अटक करण्यात आली. त्यानंतर वॉल्टर याच्याशी संबंध असल्यावरून आगोंद येथील रेस्टॉरंट मालक सुमित मदन बांदेकर याला अटक केली आहे.
काणकोणातील दोन बीच शॅकचा चालक असलेल्या वॉल्टर फर्नांडिसकडून ५.२५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तो किनारपट्टी भागात सक्रिय असलेला एक मुख्य आणि जुना अमली पदार्थ तस्कर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो पाटणे आणि पाळोळे येथे प्रत्येकी दोन शॅक्स आणि राजबाग-तारीर येथे एक नाईट क्लब चालवतो.
वॉल्टर हा देवबाग येथील फुटबॉल मैदानावर येणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. एका ग्राहकासाठी त्याने ड्रग्ज आणले होते. काणकोण पोलिसांच्या पथकाने छापा टाकून वॉल्टर याची व त्याच्या कारची झडती घेतली असता, त्याच्याकडे २४.४ ग्रॅम एमडीएमए, १११.२ ग्रॅम चरस, ३.४ ग्रॅम कोकेन असे ५ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचे ड्रग्ज आढळून आले. पंचनाम्यानंतर वाहन आणि ड्रग्ज जप्त करण्यात आले. आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आगोंद येथील रेस्टॉरंट मालक सुमित मदन बांदेकर याला या प्रकरणात अटक केली. मुख्य आरोपी वॉल्टर फर्नांडिसशी त्याचा संबंध असल्याचा आरोप आहे.
तिसरी धडक कारवाई...
पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काणकोण पोलिसांनी केलेली ही तिसरी मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई आहे. काणकोणचे उपविभागीय अधिकारी आणि दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.