कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट आरोग्य परवाना प्रकरण

म्हापसा : कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट आरोग्य दाखला प्रकरणातील संशयित आरोपी रोमिओ लेनचे सहमालक अजय गुप्ता याच्या जामिनावरील युक्तिवाद पूर्ण झाले असून, या अर्जारील निवाडा येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत म्हापसा न्यायालयाने राखून ठेवला आहे.
हडफडे येथील बर्च क्लबसाठी अबकारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत (एनओसी) दाखल्याचा वापर केल्या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी संशयित अजय गुप्ता याला दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी अटक केली होती. संशयित गुप्ता सध्या न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणात त्याने म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. शनिवारी ३१ जानेवारी रोजी फिर्यादी व बचाव पक्षाने आपले युक्तिवाद पूर्ण केले. त्यानंतर न्यायालयाने या अर्जावरील निवाड्यासाठी सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी निश्चित केली.
दरम्यान, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी गुदरलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी या बनावटगिरी प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. हा प्रकार १३ डिसेंबर पूर्वी अबकारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला होता. बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीवेळी संशयितांचा हा बनावटगिरी व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता.