‘डिजिटल अटके’च्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

आसाममधील दोघांना अटक; ३५८ सिमकार्ड, मोबाईल, लॅपटॉप जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st January, 11:30 pm
‘डिजिटल अटके’च्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

संशयितांकडून आसाम पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तू.

म्हापसा : डिचोलीतील एका महिलेला सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली तब्बल १ कोटी ४२ लाख ४ हजार ८६८ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हा शाखेने आंतरराज्य सायबर फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अशादूल इस्लाम (२४) आणि यास्मिना अहमद (३२), दोघेही रा. आसाम, यांना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्हा शाखेने या प्रकरणी गेल्या वर्षी गुन्हा नोंद केला होता. संशयित आरोपींनी पीडित कुटुंबाला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून आपण सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ‘डिजिटल अटक’ करण्यात आल्याचे सांगून सुटकेसाठी विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले होते.

पीडित व संशयितांमधील संवादाचा तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी आसाममधील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर गुन्हा शाखेच्या पथकाने नागाव (आसाम) येथे जाऊन तेथील पोलिसांच्या सहाय्याने दोन्ही संशयितांना हस्तांतरित ताब्यात घेऊन अटक केली.

दरम्यान, हे दोन्ही संशयित आसाममधील अशाच प्रकारच्या फसवणूक प्रकरणात यापूर्वी अटक झालेले होते. त्या वेळी आसाम पोलिसांनी त्यांच्याकडून ३५८ सिमकार्ड, ५ मोबाईल फोन, वायफाय राऊटर, डीव्हीआर व लॅपटॉप जप्त केला होता. गोव्यातील या फसवणूक प्रकरणातही याच मोबाईल फोन व सिमकार्डचा वापर झाल्याचे तपासात उघड झाले आहे. हेच मोबाईल क्रमांक गोव्यातील आणखी एका ६३.५० लाखांच्या डिजिटल अटक प्रकरणाशीही जोडलेले आहेत.सदर कारवाई गोवा सायबर गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देयकर, उपनिरीक्षक नवीन देसाई, कॉन्स्टेबल आरिफ आगा, रूपेश गायकवाड, संयोग शेटये व प्रकाश यांच्या पथकाने आसाम पोलिसांच्या सहकार्याने केली. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर तपास करत आहेत. 

देशव्यापी साखळी उघड होण्याची शक्यता

संशयित आरोपी देशभरातील सायबर आर्थिक फसवणुकीच्या साखळीतील मुख्य सूत्रधार असून, सामान्य आयएमईआय उपकरणांचा वापर करून अनेक मोबाईल क्रमांक कार्यान्वित करत होते. हे क्रमांक देशातील विविध सायबर फसवणूक तक्रारींशी संबंधित असल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.