तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटची ‘एनओसी’ रद्द

सहकार निबंधकांची कारवाई : सोसायटीच्या राज्यातील विस्ताराला सध्या तरी ब्रेक


2 hours ago
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेटची ‘एनओसी’ रद्द

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ऑडिट अहवाल सादर करण्यास आलेले अपयश व अटींचा भंग करण्यात आल्याने तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी सोसायटीला सहकार निबंधकांनी झटका दिला आहे. गोव्यात १३ ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी सोसायटीला दिलेला ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) सहकार निबंधकांनी रद्द केला आहे. यामुळे या सोसायटीच्या राज्यातील विस्ताराला सध्या तरी ब्रेक लागला आहे.
तिरुमला तिरुपती सहकारी सोसायटीच्या राज्यात १७ शाखा आहेत. या शाखा सुरू राहणार असल्या तरी गुंतवणूक वा अन्य व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, अशी सूचना सहकार निबंधकांनी गुंतवणूकदारांना केली आहे. तिरुमला तिरुपती सहकारी सोसायटीची स्थिती व एनओसी मागे घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय सहकार निबंधकांना कळविण्यात येईल, अशी माहिती सहकार निबंधक आशितोष आपटे यांनी दिली. माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी सहकारी बँक अशा बँकांतील गैरव्यवहारांमुळे हजारो ठेवीदारांचे लक्षावधी रुपये बुडाले आहेत. सहकारी सोसायट्या व बँकांतील गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अद्याप पूर्णत: यश आलेले नाही. दुसरीकडे नवीन सहकारी सोसायट्या व त्यांच्या शाखाही उघडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट सोसायटीला राज्यात आणखी १३ शाखा उघडण्यासाठी दिलेली मान्यता सहकार निबंधकांनी रद्द केली आहे.
राज्यात सहकारी बँक व सोसायट्यांचा विस्तार होत आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्रात किमान एक तरी सहकारी बँक अथवा क्रेडिट सोसायटी असावी, असे केंद्राचे धोरण आहे. यानुसार सहकारी संस्थांना मान्यता दिली जात आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात सहकारी क्रेडिट सोसायट्यांमधील गैरव्यवहारांमुळे गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले आहेत. माशेल महिला सहकारी क्रेडिट सोसायटीत झालेल्या गैरव्यवहारामुळे सुमारे ५०० हून अधिक ठेवीदाराना फटका बसला आहे. या सोसायटीत १८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून पैशांची वसुली करण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. दक्षिण गोव्यातील व्हिजनरी सहकारी क्रेडिट सोसायटीत झालेल्या गैरव्यवहारात ठेवीदारांचे सुमारे ४० ते ५० कोटी रुपये बुडालेले आहेत. सहकारी क्रेडिट सोसायटीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कडक करण्याचा विचार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बऱ्याचदा बोलून दाखविला आहे.
माशेल महिला सोसायटीप्रमाणेच दक्षिण गोव्यातील ‌व्हिजनरी क्रेडिट सोसायटीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. ‌व्हिजनरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या कोलवा व लोटली येथे शाखा होत्या. सोसायटीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे ११ हजार ठेवीदारांना फटका बसला आहे. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून शाखांचे व्यवहार बंद केले. खातेदार व गुंतवणूकदारांना मात्र अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. पोलिसांचा आर्थिक गुन्हा विभाग तपास करत आहे. या सोसायटीबद्दलही विधानसभेत बऱ्याचदा चर्चा झाली आहे. संचालकांची मालमत्ता जप्त करून व सोसायटीच्या मालमत्तेतून गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता मात्र अद्याप झालेली नाही. गुंतवणूकदारांनी बऱ्याचदा सरकारला निवेदने दिलेली आहेत.
या व्यतिरिक्त गेल्या वर्षात राज्यातील म्हापसा अर्बन व मडगाव अर्बन या बँका बंद पडल्या आहेत. म्हापसा अर्बन बँकेबाबत सरकारने लिक्विडेटरची नेमणूक केली आहे. काही गुंतवणूकदारांचे पैसे मिळाले असले तरी अद्याप बऱ्याच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाहीत.
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट सोसायटीविषयी....
बहुराज्य सहकारी सोसायटी कायदा २००२ अंतर्गत स्थापन.
सोसायटीचे मुख्यालय मुंबईत असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्ये शाखा.
गोव्यात मडगाव, फोंडा, केपे, म्हापसा, काणकोण, कळंगुट, तिस्क उसगाव व अन्य ठिकाणी शाखा.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कुडाळ, राजापूर अशा सर्व जिल्ह्यात शाखा.
सर्वत्र मिळून १,६४५ कोटी रुपयांच्या कायमस्वरूपी ठेवी.
गोव्यातही बरेच गुंतवणूकदार आणि कोट्यवधी रुपयांच्या ठेवी.
सहकार निबंधकांच्या कारवाईचा सुरू असलेल्या शाखांवर परिणाम होणार नाही.
सोसायटीशी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा !
सहकार निबंधकांनी तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी क्रेडिट सोसायटीला ३१ जुलै २०१४ व २८ जून २०१८ रोजी शाखा स्थापन करण्यासाठी एनओसी दिली होती. अलीकडेच सोसायटीच्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्रुटी आढळून आल्या. यामुळे सहकार निबंधकांनी शाखा उघडण्यासाठी दिलेली एनओसी रद्द केली आहे. एनओसी मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेने सोसायटीशी आर्थिक व्यवहार अथवा गुंतवणूक करताना सतर्क राहावे. तक्रार अथवा अधिक माहिती हवी असल्यास जनतेने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे सहकार खात्याने कळविले आहे.
सोसायटीच्या व्यवहारात आढळलेल्या त्रुटी
कायद्यानुसार आवश्यक असलेला ऑडिट अहवाल सादर केला नाही
कागदपत्रांची तपासणी व पाहणीला सहकार्य केले नाही
‘ना हरकत’ दाखला (एनओसी) देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केले.
सहकार निबंधकांनी बजावलेल्या नोटिसांना प्रतिसाद न देणे
चौकशीसाठी बोलावल्यानंतरही सहकार निबंधकांच्या कार्यालयात उपस्थित न राहणे

सहकारी क्रेडिट सोसायटीने दरवर्षी आर्थिक व्यवहाराबाबत लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट) सादर करणे आवश्यक असते. तिरुमला तिरुपती सोसायटीने ऑडिट अहवाल सादर केलेला नाही. अहवाल सादर करण्याबाबत पाठविलेल्या नोटिसांनाही उत्तर दिले नाही. कागदपत्रे पाहण्यासाठी खात्याचे अधिकारी गेले असता सोसायटीने त्यांना सहकार्य केले नाही. यामुळे इतरत्र शाखा उघडण्यासाठी दिलेली मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
_ आशुतोष आपटे, सहकार निबंधक

हेही वाचा