चार महिन्यांआधीचे परिपत्रक, दोन वर्षांच्या अनुभवाची अट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगाने ३० जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या ३९० प्राथमिक शिक्षकांच्या भरतीतील अटींमुळे सध्या उमेदवारांसमोर संकट उभे राहिले आहे. बीएड उमेदवारांकडून ब्रीज कोर्सची पात्रता मागितली आहे, तर बीएड, डीएड धारकांना दोन वर्षांच्या अनुभवाची अट आहे. या अटींमुळे शेकडो उमेदवार अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएड धारकांसाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालयाने सुरू केलेल्या ब्रीज कोर्सची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचलेलीच नाही. शिक्षण संचालकांनी ऑक्टोबरमध्ये याविषयी परिपत्रक काढले होते. त्यामुळे त्यावेळी ज्यांना याची माहिती मिळाली, ते आता सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेतून कोर्ससाठी प्रवेश घेत आहेत. पण कर्मचारी भरती आयोगाच्या जाहिरातीनुसार, बीएड धारकांना ब्रीज कोर्स केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
डीएड उमेदवारांना दोन वर्षे शिकवल्याचा अनुभव असावा, अशी अट आहे. डीएड, बीडए केलेले हजारो उमेदवार गोव्यात बेकार आहेत. नोकरीच्या संधी नसल्यामुळे सरकारने सुरू केलेल्या अप्रेंटेसशीप योजनेतून काहींनी काम मिळवले. त्यामुळे दोन वर्षांचा अनुभव सर्व डीएड धारकांकडे कुठून असेल? ज्यांना नोकरीच मिळाली नाही त्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे. शिक्षण खात्याच्या मान्यतेने जारी केलेल्या या जाहिरातीतील या त्रुटींमुळे ठरावीक लोकांनाच अर्ज करण्याची मुभा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत उत्तीर्ण होऊन बेरोजगार असलेले उमेदवार या नोकऱ्यांसाठी पात्रही नाहीत आणि त्यांना कुठे कामही नाही, अशी गोव्यातील स्थिती आहे.
अनुभवाच्या अटीमुळे शेकडो उमेदवार ठरणार अपात्र
गोवा विधानसभेतील माहितीप्रमाणे, शिक्षण खात्यात अप्रेंटेसशीपसाठी सुमारे ९८० उमेदवार नियुक्त झाले आहेत. त्यात काही शिक्षकांचा समावेश आहे. पण त्यातील कित्येकांना दोन वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे जाहिरातीत दोन वर्षांच्या अनुभवाची अट ही शेकडो उमेदवारांवर अन्याय करणारी ठरत आहे.