६७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी केरळच्या भामट्याला अटक

सायबर विभागाची कारवाई : संशयिताचा चार सायबर फसवणूक गुन्ह्यांत सहभाग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
६७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी केरळच्या भामट्याला अटक

पणजी : तिसवाडी तालुक्यातील एका नागरिकाला जास्त परताव्याचे आमिष दाखवून ६७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अनुराज राजेंद्रन (तिरुवनंतपुरम- केरळ) याला अटक केली आहे. त्याच्या खात्यात वरील रकमेतील २८ लाख रुपये जमा झाले होते.

या प्रकरणी करंझाळे येथील एका ५१ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली. त्यानुसार, तक्रारदाराला ८४५८०७५३९१, ८९६१२४७६७४ आणि ९५८३३४२९५४ या मोबाईल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘पिहू अर्बन लेदर’ कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधण्यात आला. संबंधित संशयितांनी तक्रारदाराला ‘दीप जीटीपी ग्लोबल ईटीएफ इन्व्हेस्टमेंट्स’ व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. तक्रारदाराला त्यात पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदाराने १ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांत सुमारे ६७ लाख रुपये जमा केले. याच दरम्यान तक्रारदाराला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर विभागात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान तपास सुरू केला असता, तिरुवनंतपुरम- केरळ येथील एका बँक खात्यात वरील रकमेतील २८ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता, साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शर्वीन डी कोस्टा, कॉ. सिद्धेश पाळणी आणि संजीव गावस यांचे पथक केरळला रवाना करण्यात आले. तेथे चौकशी दरम्यान अनुराज राजेंद्रन याला अटक करून गोव्यात आणण्यात आले.

इतर राज्यांतील फसवणूक प्रकरणात राजेंद्रनचा सहभाग

अटक करण्यात आलेल्या अनुराज राजेंद्रन याच्या बँक खात्यांची तपासणी केली असता तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि गोवा या तीन राज्यांतील एकूण चार सायबर फसवणूक प्रकरणांशी संबंधित ५४ लाख ४० हजार रुपयांची आवक त्याच्या खात्यात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांमुळे तो विविध राज्यांत घडलेल्या सायबर फसवणूक गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा संशय अधिक बळावला असून, संबंधित आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

हेही वाचा