खुर्चीवरून पडताना गळ्यातील दोरा खिळ्यात अडकून तरुणाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
57 mins ago
खुर्चीवरून पडताना गळ्यातील दोरा खिळ्यात अडकून तरुणाचा मृत्यू

मडगाव : माजोर्डा येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा एका घटनेत मृत्यू झाला. पंकज कुमार (वय ३२, मूळ रा. बेगुसराय, बिहार) असे मृत तरुणाचे नाव असून, तो सध्या माजोर्डा येथे कामाला होता. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पंकज कुमार याला मृत अवस्थेत रुग्णालयात आणले गेले होते.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिसून आले की, पंकज कुमार हा मद्यधुंद अवस्थेत एका खुर्चीवर बसून विश्रांती घेत होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो खुर्चीवरून खाली पडला. खाली पडत असताना त्याच्या गळ्यातील दोरा जवळच असलेल्या लाकडी फळीच्या खिळ्यामध्ये अडकला. यामुळे त्याचा गळा आवळला जाऊन तो बेशुद्ध पडला.

त्याला तत्काळ रुग्णवाहिकेने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सध्या मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.

या प्रकरणाचा पुढील तपास कोलवा पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश महाले करीत आहेत.