केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याच्या मागणीला ‘वाटाण्याच्या अक्षता’ !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकरांचा हल्लाबोल


2 hours ago
केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्याच्या मागणीला ‘वाटाण्याच्या अक्षता’ !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने केंद्राकडे अर्थसंकल्पातून सुमारे ४ हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र गोव्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निधी मिळाल्याचे सांगून दिशाभूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जॉन नाझारेथ, श्रीनिवास खलप, जयेश शेटगावकर उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून गोव्याला ५,५७० कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले. मात्र हा गोव्यातून जमा झालेल्या कराचा वाटा आहे. तो गोव्याचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे केंद्राला तो द्यावाच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. त्यांनी गोव्याला एक रुपयाही का दिला नाही, हे सांगावे. गोवा पर्यटनावर अवलंबून असणारे लहान राज्य आहे. येथील लोकसंख्या कमी आहे, म्हणून गोव्याला निधी दिला नाही का, हे स्पष्ट करावे. भाजप नेते कायम डबल इंजिनच्या बाता करतात. मात्र अर्थसंकल्पात गोव्याला शून्य निधी मिळाला आहे.
गोवा सरकारने पर्यटनासाठी ७०० कोटी, रेल्वे, उद्योगांसाठी सुमारे १ हजार कोटी, कुशावती जिल्ह्यासाठी ५०० कोटी, किनारपट्टी धूप रोखणे आणि पर्यावरणासाठी ६०० कोटी, आरोग्य खात्यासाठी ३०० कोटी, हरित ऊर्जेसाठी १०० कोटी रुपये मागितले होते. मात्र एकही मागणी मान्य झाली नाही. वित्त आयोगकडून गोव्याने ३,६०० कोटी रुपये मागितले होते, त्यातील केवळ १,०४९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
_ अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस