
म्हापसा : बार्देश तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार पर्वरी परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी बसवराज चंद्राप्पा हरिजन (रा. सुकूर) याला अटक केली. संशयित आरोपी हा विवाहीत आहे.
युवतीवर अत्याचाराचा प्रकार वर्षभरापासून सुरू होता. पीडित युवतीशी संशयित आरोपीने मैत्रीच्या बहाण्याने संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिचा गैरफायदा घेऊन विविध प्रसंगी तिच्यावर बलात्कार केला. शिवाय संशयिताने पीडित मुलीचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये ठेवले आणि नंतर तिला लैंगिक सुखासाठी ब्लॅकमेल केले.
पीडितेने या छळाला कंटाळून आपल्या पालकांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पीडितेच्या पालकांनी सोमवार, २ रोजी पर्वरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ६४, ७४, ३५१(२) आणि पोक्सो कायदा कलम ४ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली.
मंगळवारी बाल न्यायालयाने संशयित आरोपीला ६ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून पुढील तपास पर्वरी पोलीस करीत आहेत.