आमदार जीत आरोलकर : मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रकल्पाचा आढावा

तुये येथील पाणी प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत आमदार जीत आरोलकर.
पेडणे : मांद्रे मतदारसंघातील (Mandrem constituency) कित्येक वर्षांचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. तुये आयटीआय (Tuye ITI) परिसरात सुरू असलेल्या ३० एम.एल.डी. क्षमतेच्या पाणी प्रकल्पाचे (Water projects) काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्च महिन्यात हा प्रकल्प जनतेसाठी खुला होईल, असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री तुये येथील हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी पाणी प्रकल्पालाही भेट दिली. यावेळी आमदार आरोलकर यांनी माहिती दिली की, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणी मिळणार आहे. पाणी साठवण्यासाठी विविध गावांमध्ये नवीन टाक्या उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने अनेक वर्षांची पाण्याची समस्या आता कायमची सुटणार आहे.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलताना आमदारांनी नमूद केले की, तुये हॉस्पिटल हे ‘गोमेको’शी जोडले गेल्याने स्थानिक पातळीवरच उत्तम आरोग्य सुविधा मिळतील. तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी लिंक रस्ता तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे, जेणेकरून मोठ्या कंपन्या येतील आणि हजारो युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील. आगामी काळात रवींद्र भवन, एक्वेरियम आणि क्रीडा मैदानाचे प्रकल्प मार्गी लावले जातील.
पाणी प्रकल्प मांद्रेवासीयांसाठी महत्त्वाचा दुवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा प्रकल्प मांद्रेच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. लोकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, लवकरात लवकर याचे लोकार्पण केले जाईल. यावेळी आमदार आरोलकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.