साखळीत लवकरच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विस्तार केंद्र!

सुलक्षणा सावंत : साखळीत भारत रंग महोत्सव २०२६, आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
05th February, 12:25 am
साखळीत लवकरच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विस्तार केंद्र!

‘भारत रंग महोत्सव २०२६’ नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करताना सुलक्षणा सावंत. सोबत भरत गुप्त, विवेक नाईक, नगराध्यक्षा सिद्धी प्रभू व इतर.

साखळी : गोव्यात व भारतातही नाट्य कला मोठी आहे. या कलेत आज उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी असून त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने गोव्यात प्रथमच ‘भारत रंग महोत्सव’ या नावाने नाट्यमहोत्सव आयोजित करून गोव्यातील नाट्यरसिक व कलाकारांसमोर चांगली संधी ठेवली आहे. याच अनुषंगाने साखळीत येणाऱ्या काळात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विस्तार केंद्र स्थापन होणार आहे, असे प्रतिपादन पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी केले.
केंद्रीय संस्कृती मंत्रालय, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालय व रवींद्र भवन, साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भव्य आंतरराष्ट्रीय थिएटर महोत्सवानिमित्त २५ साव्या भारत रंग महोत्सव २०२६चे उद्घाटन साखळी रवींद्र भवनात करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सुलक्षणा सावंत बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे उपाध्यक्ष भरत गुप्त, कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, उपसंचालक मिलिंद माटे, आनंद कवठणकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत संचालक विवेक नाईक यांनी केले.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे उपाध्यक्ष भरत गुप्त यांनी महोत्सवाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, नाट्यकला केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ती लहानातील लहान रसिकांपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच यंदा साखळीसारख्या शहरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात साखळीत एन.एस.डी.चे केंद्र सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाट्यकला व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम
नाट्यकला ही व्यक्तिमत्त्व घडविणारी कला असून माणसांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास, वक्तृत्व, वाचन, स्मरणशक्ती, एकाग्रता निर्माण करते. आपल्या जीवनात प्रत्येकाने एकदा तरी नाटकात काम करून या कलेचा आस्वाद घ्यावा. या कलेतून भविष्य घडविण्याची मोठी संधी लक्षात घेतल्यास या महोत्सवाप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाट्यकला सादर करण्याची संधी मिळू शकते, असेही सुलक्षणा सावंत म्हणाल्या.                   

हेही वाचा