ही तर पवार कुटुंबाची कसोटी

दोन गटांच्या विलीनीकरणाच्या विषयावर बोलण्यास नकार देऊन प्रफुल्ल पटेल यांनी, पक्ष पुढील वाटचाल ठरवेल, असे दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितल्याने सध्या तरी शरद पवार गटाची निराशा झाल्याचे दिसते आहे. खरे तर पवार कुटुंबाची ही कसोटी आहे.

Story: विचारचक्र |
04th February, 11:17 pm
ही तर पवार कुटुंबाची कसोटी

स्व.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर पवार कुटुंबातून उमटलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांमुळे केवळ एक कौटुंबिक मतभेद उघड झाला असे नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरोगामी मूल्ये, स्त्री नेतृत्वाची स्वीकृती आणि सत्तासंघर्षाचे वास्तव यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महाराष्ट्राचा राजकीय वारसा हा पुरोगामी, समतावादी आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा मानला जातो. अशा राज्यात एखादी महिला घटनात्मक पदावर शपथ घेत असताना तिच्या पात्रतेपेक्षा ती कुणाची पत्नी आहे, कुटुंबाची परवानगी होती का, अशा सुरात प्रतिक्रिया देणे हे राजकीय टीकेपेक्षा वैयक्तिक टोमणा अधिक ठरते. श्रीमती सुनेत्रा या पवार कुटुंबात बाहेरून आलेल्या आहेत, असे म्हणणे हा तर कहर झाला. ही टीका वैचारिक नव्हती, धोरणात्मक नव्हती, तर ती राजकीय अस्वस्थता दर्शवणारी होती. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ एका व्यक्तीचा राजकीय प्रवेश नव्हता; तो होता पवार कुटुंबातील सत्ता-संतुलन बदलण्याचा संकेत. राजकारणात अधिकार कोणाचा? या प्रश्नाला दिलेले ते उत्तर होते. कुटुंबातील टीका ही स्त्री नेतृत्वाविरोधी उघड भूमिका नसली, तरी अप्रत्यक्षपणे तशीच जाणवली. कारण जर हाच निर्णय एखाद्या पुरुषाने घेतला असता, तर प्रतिक्रिया इतक्या तीव्र झाल्या असत्या का? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पवार कुटुंबात राजकारण हे विचारांचे कमी आणि वारसाहक्काचे अधिक राहिले आहे. त्याला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने हादरा बसला. राजकारणातील प्रवेश काही निवडक लोकांचाच मक्तेदारीचा विषय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस मानतो असाही त्याचा अर्थ होतो. शपथविधीनंतरची टीका म्हणजे एका गटाची अस्वस्थता होती कारण दुसऱ्या गटाची ताकद वाढत होती. याचा उघड स्वीकार करण्याऐवजी नैतिकतेचा आव आणून टीका करण्यात आली. महाराष्ट्राने नेहमीच महिलांना नेतृत्वात स्थान दिले, मतभेद वैचारिक पातळीवर मांडले, व्यक्तीपेक्षा संस्थांना महत्त्व दिले. अशा पार्श्वभूमीवर शपथविधीसारख्या घटनांवर वैयक्तिक, उपरोधिक प्रतिक्रिया देणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसे नाही.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राजकीय प्रतिकात्मकता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. पवार घराण्यातील सत्ताकेंद्र हे अनेक वर्षे शरद पवार–सुप्रिया सुळे या रेषेत होते. मात्र उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवारांचा प्रवेश म्हणजे अजित पवार गटाकडे घराण्याची वैधता गेली. खरा वारसदार कोण? या प्रश्नावर अजित पवार गटाचा दावा मजबूत झाला. शरद पवार गट नैतिक उंचीवर असला तरी सत्तेपासून दूर गेला. या अर्थाने पाहिले तर, राजकीय ताकदीच्या खेळात शरद पवार गट सध्या मागे आहे, हे नाकारता येत नाही. म्हणूनच पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाचे तुणतुणे वाजवले जात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

सुप्रिया सुळेंची संधी गेली असे म्हणणे घाईचे ठरेल. पण उपमुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली हे मात्र खरे. पवार घराण्यातील मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा ही प्रतिमा सुप्रिया सुळेंकडून दूर गेली. घरातच दुसरे सत्ताकेंद्र उभे राहिल्याने त्यांची पातळी खाली घसरली. म्हणजे, या टप्प्यावर संधी हातातून निसटली, हे वास्तव आहे. असे असले तरी काही बाबी सुप्रिया सुळेंच्या बाजूनेही आहेत. त्या अजूनही स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा आहेत. शरद पवार गटाकडे संघर्षाची सहानुभूती आहे. केंद्रातील विरोधी राजकारणात सुप्रिया सुळे यांचे महत्त्व कायम आहे. 

महाराष्ट्रात सत्ताविरोधी वातावरण तयार झाल्यास, सत्तेपासून दूर राहिलेला पवार गट फायदा घेऊ शकतो. अजूनही खेळ संपलेला नाही; मात्र आता सुप्रिया सुळेंना संघर्ष, जनाधार आणि स्वतंत्र नेतृत्व सिद्ध करावे लागेल. फक्त पवार घराण्याचा चेहरा म्हणून नव्हे, त्यामुळे, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमुळे सुप्रिया सुळेंची संधी गेली, असे म्हणता येईल पण राजकारणात अंतिम अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. दोन्ही गटांचे विलीनीकरण, त्यानंतर भाजपसोबत राहायचे की विरोधात जायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पवार गट फार दिवस एकाकी राहील अशी अपेक्षा करता येणार नाही. सुप्रिया सुळेंना केंद्रात एखादे मंत्रिपद देऊन भाजप हा संपूर्ण पक्ष आपल्या कह्यात घेऊ शकतो. त्याच दिशेने पडत असलेली पावले सर्वेसर्वा शरद पवार रोखू शकतील असे वाटत नाही. याच कारणास्तव स्व. अजित पवार यांची एकत्र येण्याची इच्छा होती, असे शरद पवार नुकतेच म्हणाले. ती हतबलतेची चिन्हे आहेत. 

सुनेत्रा पवार १२ दिवस थांबल्या असत्या तर त्यांच्या पक्षाचे शरद पवार यांनी तेरावे घातले असते असे एक राजकीय निरीक्षक नुकतेच म्हणाले. तोपर्यंत अजित गटाला त्यांनी खिंडार पाडले असते ही शक्यता नाकारता येणार नाही. प्रफुल्ल पटेल, छगन भूजबळ, तटकरे यांनी ही खेळी ओळखून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानेच घाईत शपथविधी घडवून आणला आणि ज्येष्ठ पवारांचे मनसुबे उधळले असे जे मानले जाते, ते खरे असावे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द या शक्यतेला दुजोरा देते. आम्ही विधिमंडळ नेता निवडला, नंतर राष्ट्रीय अध्यक्षही पक्ष निवडेल, त्यासाठी राज ठाकरे किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनी सल्ला देऊ नये, अशी रोखठोक भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारी अध्यक्ष या नात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडली. त्यावेळी विलीनीकरणाच्या विषयावर बोलण्यास नकार देऊन पक्ष पुढील वाटचाल ठरवेल, असे सांगितल्याने सध्या तरी शरद पवार गटाची निराशा झाल्याचे दिसते आहे. 

खरे तर पवार कुटुंबाचीच ही कसोटी असून, शरद पवार त्याला कोणत्या पद्धतीने सामोरे जातात, हे लवकरच दिसून येईल. एक मात्र खरे की, अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांचा गट पूर्वीच्याच जोमाने पुढे आला आहे. यामागे कोणती शक्ती आहे, कोणते डावपेच आहेत हे वेगळे सांगावे लागत नाही.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४