
मागील काही वर्षांत राज्यातील महिलांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढली आहे. राज्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत १,८२५ महिलांना स्तन किंवा गर्भाशयाचे मुख किंवा बीजांडकोषाच्या (ओव्हरी) कर्करोगाचे निदान झाले होते. याचाच अर्थ दिवसाला सरासरी एका महिलेला कर्करोगाचे निदान झाले आहे. या दरम्यान ८५४ रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच महिन्याला सरासरी १४ महिला रुग्णांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. यामध्ये केवळ तीन प्रकारच्या कर्करोगाची माहिती आहे. महिलांमधील अन्य प्रकारच्या कर्करोगाची संख्या आणखी अधिक आहे.
संपूर्ण देशाची आकडेवारी पाहता, पाच वर्षांत ११.४२ लाख महिलांना स्तनाचा, ३.९० लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा तर २.३७ लाख महिलांना ओव्हरीचा कर्करोग झाला होता. पाच वर्षांत देशात स्तनांचा कर्करोग झालेल्या ४.९१ लाख महिलांचा मृत्यू झाला, तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या २.१० लाख आणि ओव्हरी कर्करोग झालेल्या १.४५ लाख महिलांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील महिलांमध्ये कर्करोग निदान तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक होते, तर अरुणाचल प्रदेश, मेघालयात हे प्रमाण अत्यल्प होते.
महिलांमध्ये कर्करोग रुग्णसंख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आयुष्यातील तणाव, निकृष्ट दर्जाचा आहार, जंक फूड खाणे, व्यायाम न करणे अशा विविध गोष्टी आजारात वाढ करत आहेत. अनेकदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजार अंगावर काढतात. रोगांच्या प्राथमिक लक्षणांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याशिवाय घर तसेच नोकरी सांभाळताना होणारी तारांबळ, येणारा ताण आदींमुळे देखील असे आजार वाढत आहेत. याशिवाय बदललेल्या जीवशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, लठ्ठपणा, पक्षाघात असे विविध आजार होत आहेत.
वेळीच लक्षणे ओळखल्यास, लक्षणे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग बरा होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी महिलांनी वर्षातून दोन वेळा वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आजार असो वा नसो, अशा तपासण्या नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. कर्करोगावरची उपचार पद्धती आधुनिक झाली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात सरकारी इस्पितळात आधुनिक उपचार अगदी मोफत उपलब्ध आहेत. सरकारतर्फे कर्करोग निदान व्हॅन देखील चालवली जाते.
राज्यात सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे आजाराचे लवकर निदान झाल्यामुळे त्वरित उपचार सुरू करणे शक्य झाले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. भविष्यात अन्य आजारांसाठी देखील असे तंत्रज्ञान वापरण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. एकूणच राज्यातील जनतेने लक्षणांकडे दुर्लक्ष न करता या आधुनिक सुविधांचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. असे केल्यास राज्यातील कर्करोग रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
- पिनाक कल्लोळी