जलस्रोतांचे रक्षण गरजेचे

आम्ही पाणथळ भूमीच्या शिस्तबद्ध संवर्धन आणि संरक्षणासाठी आतापासून विशेष प्रयत्न केले नाही तर त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे.

Story: विचारचक्र |
03rd February, 10:13 pm
जलस्रोतांचे रक्षण गरजेचे

पिसुर्ले हा कृषी व्यवसायासाठी ख्यात असलेला गाव. आज खाण व्यवसायाने त्याच्या अस्तित्वावर घाला घातल्याने संकटग्रस्त झालेला आहे. ज्या तळ्याच्या पाण्याचा विनियोग करून मोठ्या प्रमाणात भाताची पैदास केली जायची आणि ज्या तांदळाच्या पेजेचा आस्वाद घेण्याचा मोह झालेली देवी आकाशमार्ग सोडून पिसुर्लेत पेजाळी देवी झाली तो अख्खा परिसर, तिथले बारामाही पाण्याने युक्त असलेले तळे आज खाणमातीच्या गाळाने उद्ध्वस्त झालेले आहे. शेतीला जलसिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने इथले भलेमोठे शेतमळे पडीक राहिलेले आहेत. नेत्रावळी अभयारण्याच्या शेजारी सांगे तालुक्यातील उगे गावात जे खनिज उत्खनन चालू होते, त्यांनी चक्क त्याठिकाणी असलेल्या देवराईला गिळंकृत करून आणि बारामाही पाणी असलेल्या तळ्याला उद्ध्वस्त केलेले आहे. खनिज उत्खनन करताना पर्यावरणीय नियमांची तमा न बाळगता किंवा खाणीशेजारी असलेल्या जांभ्या दगडांच्या ऐतिहासिक दवरणे आणि देवराईच्या अस्तित्वाला काडीची किंमत न देता, आपला व्यवसाय चालू ठेवला. एकेकाळी जल-जंगल-जमीन यांनी समृद्ध असलेल्या पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात लोहखनिज उत्खनन चालू राहिल्याने येथे दुर्घटना उद्भवून, खाण मातीच्या ढिगाऱ्याखाली कामगार  मृत्युमुखी पडले होते. अभयारण्य आणि त्यात असणाऱ्या देवराई,  ऐतिहासिक मंदिर यांच्या अस्तित्वाला किंमत न देता येथे खाण व्यवसाय चालू राहिला आणि त्याने तेथील तळे इतिहासजमा केले. लोहखनिजाच्या उत्खननासाठी तेथील डोंगर, जंगल आणि जलस्रोत यांचा कल्पनेपलीकडे विध्वंस मांडलेला आहे.

लाम्हाग्राम एकेकाळी बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्याने पुनीत झाला होता. कधीकाळी तेथे हिरवेगार जंगल, सदा खळाळणारे पाणी, आल्हाददायक हवामान यामुळे बौद्ध भिक्षूंची वस्ती होती. आजचा लामगाव पूर्वी या गुंफेच्या परिसरात होता. तेथे म्हात्राई देवीचे तळे होते. बारामाही पाणी खळाळत असल्याने शेती, बागायती करणारे भूमीपुत्र लामगावात आनंदात राहत होते. परंतु जेव्हा येथे लोहखनिज उत्खनन सुरू झाले, तेव्हा हा हा म्हणता येथील निसर्ग आणि पर्यावरणाला असंख्य धोके निर्माण झाले. इथले तलाव, झरे आणि अन्य पाणथळ जागा यांचा खाणींनी अक्षरशः विध्वंस मांडला. एकेकाळी पट्टेरी वाघांच्या डरकाळ्यांनी निनादणारा हा परिसर पाहता पाहता खनिज उत्खनन करणारी यंत्रसामुग्री, खनिजवाहू ट्रकांच्या कर्कश आवाजाने ओळखण्यापलिकडे पोहोचलेला आहे. कुळागरांत, शेतांत बारामाही जलसिंचनाचे पाणी खळाळणारा गाव आज एकापेक्षा एक संकटांना सामोरा जात आहे आणि त्यामुळे पिण्याच्या आणि जलसिंचनाच्या पाण्यासाठी लामगाव पूर्णपणे परावलंबी झालेला आहे. म्हात्राईचे पवित्र तळे खाण-मातीच्या गाळाने आपले पूर्वीचे वैभव हरवून बसलेले आहे.

३००० मीटर लांब, ५ मीटर रुंद आणि ६ मीटर उंची असलेला  सांताक्रुजचा चिरकुल्याचा बांध येथील भूमीपुत्रांच्या अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तुंग आविष्कार होता. तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुजला जलव्यवस्थापन आणि जलनियोजनाचा समृद्ध वारसा होता. एकेकाळी इथे असलेल्या शेकडो विहिरी भूमीपुत्रांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवत होत्या. शेती, बागायती, भाजीपाला या जलसिंचन सुविधा पुरवण्याची कामगिरी पाण्यासाठी खणले जाणारे 'होंडे' पूर्ण करत होते. सांताक्रुजच्या ग्रामसंस्थेने १९०८ मध्ये गावातील भूगर्भजलसाठा वृद्धिंगत करण्यासाठी लोक सहभागातून बोंडवेलचा तलाव खोदला. या बोंडवेल तलावाच्या ओलिताखाली इथले १०० हेक्टर क्षेत्र यायचे. सुमारे २ कि.मी. लांबीचा मातीचा कालवा आराडी-बांधापर्यंत पाणी न्यायचा. कुजिरा-मेरशीच्या तलावाच्या माध्यमातून पाण्याचा संचय होत असे. बोंडवेल तलावाच्या पाण्याच्या साठ्यावर या परिसरातील वांयगण शेती आणि भाजीचे मळे फुलले, फळले जायचे. सांताक्रुज-कालापूरच्या कष्टकरी जाती-जमातींच्या शेतांना जलसिंचनाची सुविधा पुरविण्याची कामगिरी बोंडवेल, कुजिरा-मेरशीचे तलाव करायचे. वृक्षवेलींच्या कुशीत वसलेले हे तलाव आर्द्र भूमीची उज्ज्वल परंपरा मिरवत होते. आज ही परंपरा इतिहासाच्या उदरात लोप होण्याच्या वाटेवर आहे. कदंब पठाराशी संलग्न असणाऱ्या तिसवाडीतील चिंबल गावाचे भूषण असणाऱ्या तोय्यार तलावाच्या पर्यावरणीय आणि भूगर्भजल साठ्याच्या अस्तित्वाचे संरक्षण करणाऱ्या संवेदनासम क्षेत्रात गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने युनिटी मॉल आणि प्रशासकीय कार्यालयांचा प्रकल्प उभारण्याचे योजिले आहे, त्याच्या विरोधात चिंबल गावातील आदिवासी आणि कष्टकरी जाती-जमाती एकत्र येऊन अविरतपणे बुलंद आवाज उठवत आहे- जलसिंचनाच्या गरजेची पूर्तता करणाऱ्या तोय्यार तलावाचे अस्तित्व नष्ट करू पाहणाऱ्या प्रकल्पाविरुद्ध लोकमानस संघर्ष करत आहे.

गोव्यातल्या प्रत्येक गावाने पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी तलाव, तळी, पोटतळी, झरे, ओहळ यांच्या संवर्धनाला ग्रामसंस्थेच्या माध्यमातून प्राधान्य दिले होते. आज इथल्या एकापेक्षा एक सरस अशा पाणथळ जागा मानवी समाजाच्या अक्षम्य चुकीच्या व्यवहारामुळे लोप पावलेल्या आहेत. पाणथळ भूमीत मातीचा भराव घालून, कचरा टाकून, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडून, गुराढोरांना चरण्यास सोडून, रासायनिक घटकांचा गैरवापर करून या पाणथळ भूमीच्या क्षेत्रांना संकटाच्या खाईत लोटलेले आहे. पाणथळ भूमीचा विवेकपूर्ण वापर आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आपण आतापासून विशेष प्रयत्न करणे नितांत गरज आहे, याची जाण ठेवली पाहिजे.

गोव्यातील पाणथळ भूमींची सध्याची स्थिती अत्यंत बिकट असून, एकेकाळी गावाला पिण्याचे पाणी आणि जलसिंचनाची सुविधा पुरवणारे हे जलस्त्रोत इतिहासजमा झालेले आहे. पणजीत आल्तिनो येथील पावसाचे कोसळणारे पाणी मळा येथील तळ्यात यायचे. आज हे तळे सांडपाणी, केरकचरा यामुळे संकटयुक्त झालेले आहे. पणजी महानगरातील लोकांना पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध होत असल्याने त्यांना या तळ्याच्या अस्तित्वाची कशी काळजी असणार? डिचोलीतील कुडणे, फोंड्यातील कुंडई ही गावे कधीकाळी औषधीयुक्त पाण्याच्या कुंडांनी युक्त होती. कुडणेतील कुंडे खाण व्यवसायाने उद्ध्वस्त केली तर कुंडईतील जलस्रोतांना येथील औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणकारी कारखान्यांनी कधीच संकटग्रस्त केलेले आहे. आम्ही पाणथळ भूमीच्या शिस्तबद्ध संवर्धन आणि संरक्षणासाठी आतापासून विशेष प्रयत्न केले नाही तर त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५