प्रस्थापितविरोधी लाट तयार होण्यासाठी आजची राजकीय परिस्थिती अनुकूल असली तरीही काँग्रेस या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे का, या प्रश्नाचे उत्तर कॉंग्रेसच्या निवडणूकपूर्व आघाडीच्या राजकारणावर व संघटनात्मक पातळीवरील बांधणीवर अवलंबून आहे.

एका राजकीय पक्षाच्या खंद्या कार्यकर्त्याशी एक दिवस चांगली रंगतदार चर्चा घडली. हा कार्यकर्ता तसा कट्टर भाजप व परिवारातील जुना असामी होता. त्याला पक्षाविषयी सहानुभूती होती व आहे, समर्थनही आहे. पक्षासाठी खस्ता खाल्ल्याने दुसऱ्या विचारसरणीचा सहवास नकोसा वाटतो. पण भाजपचा कट्टर समर्थक असूनही त्याने एक गोष्ट स्पष्टपणे, मोकळेपणे व खुल्या मनाने सांगितली. ज्या दिवशी कॉंग्रेसला चांगले नेतृत्व मिळेल व संघटना पातळीवर कॉंग्रेस काम करेल, त्या दिवशी भाजपचे काही खरे नाही.
२०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणूक निकालांचे निरीक्षण केले तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते ती म्हणजे, अनेक कॉंग्रेस उमेदवार अगदी कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेले आहेत. वेळ्ळी व कुडचडे मतदारसंघात अनुक्रमे १७० व ६७२ मतांनी कॉंग्रेस उमेदवार पराभूत झालेले आहेत. ज्या ठिकाणी विभाजित झालेली मते लक्षात घेतली, तर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आणि आम आदमी पक्षाने ही मते प्राप्त केली हे लक्षात येते. उत्तरेत आरजीने कॉंग्रेसची पारंपरिक मते आपल्याकडे वळवली तर दक्षिणेत कॉंग्रेसला आपने आव्हान दिल्यामुळे हानी पोहोचली, हे गेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. अपक्ष, लहान पक्ष, आप आणि आरजी या पक्षांच्या मतांची बेरीज केली आणि टक्केवारी काढली असता असे लक्षात येते की, कॉंग्रेसला जनाधार असूनही मतविभाजनामुळे, संघटना पातळीवरील उदासीनता, पक्षाच्या प्रादेशिक नेतृत्वाला संघटनेचे बळ नसणे अशा अनेक बाबींनी कॉंग्रेसचा पराभव साकार झाला.
२०१७ साली तर कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्याची सुवर्णसंधी आली होती, पण अंतिम निर्णय घेण्यात पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दिरंगाई केली आणि हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपने पळवला. २०१७ चे निकाल पाहता एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, गोव्यात कॉंग्रेस हा भाग्यवान पक्ष आहे आणि भाजप हा कष्टाळू पक्ष आहे. कॉंग्रेसला २०१७ सालचे यश हे विनाकष्ट मिळाले होते, तर भाजपला १३ जागांवर आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले होते. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने भरपूर कष्ट घेतले आणि आपले २० उमेदवार निवडून आणले. त्यातील दहा ते बारा उमेदवार हे एक हजारच्या आसपास मताधिक्याने निवडून आले होते. कॉंग्रेसने जर वेळेत निवडणूकपूर्व युती करून मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित चित्र वेगळे असते. पण कॉंग्रेस आपण राष्ट्रीय पक्ष आहोत आणि बाकीचे प्रादेशिक पक्ष आहेत, या विचारातून बाहेर आल्यास काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात.
२०२२ च्या निवडणुकीनंतर भाजपने आपला सत्तेचा खुंटा हलवून घट्ट करण्यासाठी म्हणून कॉंग्रेसचे आठ आमदार फोडले आणि हे आमदार भाजपमध्ये आले. त्यातील तीन-चार आमदार तर आधी भाजपवासी होते. या आमदार ओहोटीमुळे कॉंग्रेस पक्ष विधानसभेत कमकुवत झाला, हे नाकारता येणार नाही. पण ही राजकीय घडामोड कॉंग्रेससाठी एक इष्टापत्ती आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
या घाऊक पक्षांतरामुळे कॉंग्रेसमध्ये असलेली जुनी बांडगुळे गेलीच, पण अनावश्यक मध्यमवयीन राजकारणीही भाजपच्या तंबूत रवाना झाले. याचा फायदा कॉंग्रेसला संघटना वाढवण्यात व नवीन नेतृत्वाला अधिकाधिक वाव देण्यात करता आला असता. पण भाजपकडे असलेली संघटनात्मक पातळीवरील चपळता कॉंग्रेसकडे नाही, हे जमिनीवरील वास्तव आहे. कॉंग्रेसमध्ये पदाधिकारी निर्णय घेण्यात फार वेळ काढतात आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. तरीही अजून उशीर झालेला नाही.
आजची कॉंग्रेस ही तरुणांनी भरलेली अन् भारलेली आहे. प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, आमदार पाहिले तर लक्षात येते की पक्षातील जुनी नेतेमंडळी आता एकतर बाजूला झाली आहे, नाहीतर भाजपच्या गोटात दाखल झाली आहे. जे कुणी दिसत आहेत ते तरुण आहेत, उमदे आहेत आणि रोजच्या रोज पक्ष कार्य करताना दिसत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपला सत्तेत राहून पंधरा वर्षे पूर्ण झाली आणि प्रस्थापितविरोधी लाट तयार होऊ शकते, हे वर्तमान काळातील सरकारविरोधातील निदर्शनांवरून कळून येते.
प्रस्थापितविरोधी लाट तयार होण्यासाठी आजची राजकीय परिस्थिती अनुकूल असली तरीही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे का, या प्रश्नाचे उत्तर कॉंग्रेसच्या निवडणूकपूर्व आघाडीच्या राजकारणावर व संघटनात्मक पातळीवरील बांधणीवर अवलंबून आहे.
भाजपने कितीही प्रचार केला, योजना जाहीर केल्या तरीही आजही कॉंग्रेसला जनाधार आहे आणि तो पक्ष परत पुन्हा उसळी घेऊन वर येऊ शकतो, हे भाजपला ठाऊक आहे व म्हणूनच भाजपचा भर हा प्रस्थापितविरोधी लाट निष्प्रभ करण्यावरच असतो. मागच्या निवडणुकीत लागलेली ठेच लक्षात घेऊन या निवडणुकीत कॉंग्रेस शहाणी होणार का, या प्रश्नाचे उत्तर बहुदा पुढच्या वर्षीच मिळेल. जनाधार हा त्याच पक्षाला मिळतो, जो जनमानसात आपले स्थान टिकवून ठेवतो आणि हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी सतत लोकांमध्ये राहावे लागते, डोळ्यात तेल घालून चोवीस तास राजकारण करावे लागते. जेमतेम असलेला जनाधार टिकवून ठेवायचा असेल आणि भविष्यात तो वाढवायचा असेल तर कॉंग्रेसला आघाडीचे राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही.
कॉंग्रेसकडे सर्व काही आहे, आणि या सर्व काहीत मुख्य म्हणजे मतदार आहेत. पण ज्या पक्षाच्या बाजूने मतदार आहेत, त्या पक्षाला आणखीन कशाचीही गरज नाही असा कुणीही अन्वयार्थ लावण्याचे कारण नाही. दोन्ही हातांनी कष्ट केल्याशिवाय कॉंग्रेसला सत्ता मिळणार नाही, हे सत्य यानिमित्ताने गडद व अधोरेखित होणे गरजेचे आहे.

प्रा. विघ्नेश शिरगुरकर
(लेखक कथालेखक, अनुवादक
आणि कवी आहेत.)