
गेल्या अनेक महिन्यांपासून अशांततेच्या छायेत असलेल्या ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. सुमारे वर्षभरापासून सुरू असलेली राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी बुधवारी मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
इंजिनिअर असलेले ६२ वर्षीय युमनाम खेमचंद सिंह हे इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. बीरेन सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. संघ परिवाराशी असलेले जवळचे संबंध आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. ते तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय खेळाडूही राहिले आहेत. युमनाम यांची प्रतिमा स्वच्छ असून ते निष्पक्ष कार्यशैलीसाठी ओळखले जातात. मंगळवारी भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत खेमचंद यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. या निवडीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी संबित पात्राही उपस्थित होते.
मे २०२३ मध्ये मैतई आणि कुकी समुदायांत झालेल्या जातीय हिंसेमुळे मणिपूर होरपळून निघाले होते. या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर हजारो नागरिक बेघर झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता परिस्थिती सुधारत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करून राष्ट्रपती राजवट तातडीने मागे घेतली असून नवीन सरकारही शपथबद्ध झाले आहे. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपचे ३७ आमदार असून एनडीएचे घटक पक्ष असलेल्या एनपीपी (६ आमदार) आणि नागा पीपुल्स फ्रंट (५ आमदार) यांचाही सरकारला पाठिंबा आहे.
राज्यातील मैतेई, कुकी आणि नागा या तिन्ही समुदायांमध्ये समतोल राखण्यासाठी भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठेवला आहे. नागा आमदार लोसी दिखो यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते नागा पीपल्स फ्रंटचे सदस्य आहेत. कुकी समुदायाच्या सदस्या नेमचा किपगेन यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करून सर्वंकष विकास साधणे, हे नवीन सरकारसमोरील मोठे आव्हान असणार आहे.
- प्रदीप जोशी