गोमेकॉत १०० ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंगला प्रारंभ

प्रायोगिक तत्त्वावर सेवा : मेडिसीन, सर्जरी, त्वचा, ईएनटी, अस्थिरोग विभागांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोमेकॉत १०० ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंगला प्रारंभ

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा वेळ वाचवण्यासाठी आणि ओपीडी (OPD) बाहेरील रांगा कमी करण्यासाठी गोमेकॉतील ५ महत्त्वाच्या ओपीडीत ऑनलाईन बुकिंग (Online booking) प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे.
सध्या ही सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली असून, मेडिसिन, सर्जरी, त्वचा, ईएनटी आणि अस्थिरोग विभागांच्या ओपीडींचा यात समावेश आहे. या विभागांत प्रत्येकी १०० रुग्णांना ऑनलाईन बुकिंग करता येईल. या प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद आणि अभिप्रायानुसार अन्य विभागात देखील अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासोबत नेहमीच्या ऑफलाईन पद्धतीने रांगेत उभे राहून ओपीडीचा लाभ घेता येणे देखील सुरूच राहणार आहे.
गोमेकॉच्या ऑनलाईन अपॉईंटमेंट पोर्टलवर मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी दिल्यावर रुग्णांचे प्रोफाईल ओपन होईल. याआधी रुग्णांची नोंद केली नसल्यास नवीन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना डीडीएसएसवाय किंवा आभा क्रमांकाची माहिती भरावी लागेल. नवीन रुग्णांना १०० रुपये, तर विदेशी नागरिकांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. हे नोंदणी शुल्क २ वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ऑनलाईन स्लॉट बुक झाल्यावर रुग्णाला ऑनलाईन पद्धतीने कन्फर्मेशन स्लिप मिळेल. ही स्लिप गोमेकॉच्या ओपीडीमध्ये दाखवावी लागेल. रुग्णांनी वेळेआधी ३० मिनिटे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
बुकिंग प्रक्रिया आणि नियम
- रुग्णांना https://www.gmcgoa.edu.in या पोर्टलवर जाऊन बुकिंग करावे लागेल.
- दुसऱ्या दिवशीसाठीचे बुकिंग आदल्या दिवशी संध्या. ५ वाजता बंद होईल.
- स्लॉट बुकिंग करताना पुढील ७ दिवसांपर्यंतची अपॉईंटमेंट घेता येईल.
- ऑनलाईनचे शिल्लक स्लॉट दुसऱ्या दिवशी ऑफलाईनमध्ये जोडले जातील.      

हेही वाचा