सहकार निबंधकांकडे आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने स्थिती 'जैसे थे'च

पणजी: तिरुमाला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखांमधून आपल्या ठेवी काढण्यासाठी बुधवारी झालेली गर्दी गुरुवारी काहीशी कमी झाली असली, तरी गुंतवणूकदारांमधील भीती अद्याप कायम आहे. दरम्यान, सोसायटीचे प्रतिनिधी गुरुवारी सायंकाळी सहकार निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे सोसायटीबाबतची अनिश्चितता कायम आहे.
तिरुमाला तिरुपती सोसायटीला १३ नवीन शाखा सुरू करण्यासाठी दिलेली ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) ३ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या निर्णयाचे पडसाद बुधवारी उमटले. राज्यातील सर्व शाखांमध्ये खातेदारांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोसायटीच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि नोटिशीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आश्वासन दिले.
सहकार खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत सोसायटीकडून ऑडिट अहवाल आणि इतर कागदपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र सरकारसमोर येणार नाही. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांची कसून तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. अद्याप सोसायटीने कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर केलेली नसल्याने सध्यातरी परिस्थिती 'जैसे थे' आहे.