
मडगाव: मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित (वय २३) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा मागील पाच वर्षांपासून पीडित अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. अत्याचारांनंतरही तो 'इन्स्टाग्राम'च्या माध्यमातून पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. पीडितेचा मित्र असलेल्या एका 'फर्नांडिस' नावाच्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून तो समाजमाध्यमांवरून तिला वारंवार त्रास देत होता.
संशयित आरोपी पीडितेकडे तिची नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ मागत होता; तसेच मागणी पूर्ण न केल्यास 'पॉर्न' संकेतस्थळांवर अश्लील साहित्य व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. या सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी 'गोवा बाल कायदा'आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.