
पणजी : पेडणे तालुक्यातील न्यू-वाडा,मोरजी येथील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले आहेत. या अपघातात बुलेट आणि फॅसिनो या दोन दुचाकींत समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये भाटीवाडा-मोरजी येथील साहिल शेटगावकर हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरा युवक प्रितेश हरमलकर (गावडेवाडा-मोरजी) हा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकीस्वार एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असताना हा अपघात घडला. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे गतिरोधक उभारण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक रहिवासी करत होते. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळेच आज हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मोरजी हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अनेक पर्यटक भाड्याने घेतलेली खासगी वाहने सुसाट वेगाने चालवतात. विनाहेल्मेट आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या या पर्यटकांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिलेला नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करावी आणि न्यू वाडा येथील मुख्य रस्त्यावर तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.