४ जणांकडून वसूल केला तब्बल ४० हजारांचा दंड.

मडगाव: मडगाव नगरपालिकेकडून पालिका क्षेत्रात घरोघरी कचरा संकलन केले जाते आणि शहरातील 'ब्लॅक स्पॉट्स'ही हटवण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने, रात्रीच्या वेळी पालिका अभियंता व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत पालिकेने ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मडगाव शहर कचरामुक्त करण्यासाठी नगरपालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक ट्रक, जेसीबी व इतर यंत्रसामग्रीही उपलब्ध करण्यात आली आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून कचरा टाकला जात असल्याने आता पालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी मध्यरात्री मडगाव नगरपालिकेचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरात अचानक गस्त (मिडनाईट पेट्रोलिंग) घातली. या पथकाने विविध भागांत लक्ष ठेवून कचरा टाकणाऱ्यांवर मोठी कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. नगरपालिकेने एकूण चार जणांवर कारवाई करत एकाच रात्रीत ४० हजारांचा दंड वसूल केला.
सीसीटीव्ही असूनही कचराफेक
शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले असूनही काही जण दुचाकीवरून येत वारंवार कचरा टाकत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी जे वाहनचालक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कचरा टाकताना दिसले, त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र, दुचाकींचे क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने मध्यरात्री प्रत्यक्ष मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले आणि कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यात आले, अशी माहिती अभियंता दीपक फळदेसाई यांनी दिली.
कचरा शेजारच्या पंचायत क्षेत्रातील
मडगाव पालिका 'ब्लॅक स्पॉट्स' स्वच्छ करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करत आहे. मात्र, त्याच ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जात असून, हा कचरा शेजारच्या पंचायत क्षेत्रांतून येत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरूच राहणार आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि कचरा फक्त अधिकृत कचरा संकलन गाड्यांमध्येच द्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
राय येथील संशयित पोलिसांच्या ताब्यात
बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत 'राय' पंचायत क्षेत्रातील एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित आस्थापनाच्या मालकाला बोलावून घेतले. मालकाने कचरा टाकण्यावरून पथकाशी शाब्दिक वाद घातल्याने, त्याला गाडीसह पुढील कारवाईसाठी फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.