इंडियन कॅन्सर सोसायटी

नवी दिल्ली : पुढील दोन दशकांत भारतात (India) कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता इंडियन कॅन्सर सोसायटीने व्यक्त केली आहे. हे मोठे संकट बनत असून, देशभरात दरवर्षी १५ लाख नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, २०४५ पर्यंत ही संख्या १५ लाखांऐवजी २४.५ लाख होण्याची भीती इंडियन कॅन्सर सोसायटीने (Indian Cancer Society (ICS) व्यक्त केली आहे. ही भीती खरी ठरली तर देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येईल असेही सोसायटीने म्हटले आहे. उपचारांच्या विस्ताराबरोबरच लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांना केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त (World Cancer Day) आयोजित एका पत्रकार परिषदेत दिल्ली येथील इंडियन कॅन्सर सोसायटीने वरील इशारा दिला. याच वेळी २०२६ २७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही निवडक कर्करोगाच्या औषधांवरील सीमा शुल्कात सूट आणि उपचारांची उपलब्धता सुधारण्यासाठी देशांतर्गत बायोफार्मा उत्पादनाला नव्याने चालना देण्याची घोषणा करण्यात आली.
मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करीत म्हटले की, केवळ याच उपाययोजना पुरेशा नसून; कर्करोगाचे प्राथमिक स्थितीत निदान होण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. कारण कर्करोग बाधित बरेच रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलात पोहोचतात.
प्राथमिक स्तरावरच उपाय होणे गरजेचे
आयसीएस दिल्लीच्या अध्यक्ष ज्योत्सना गोवील यांनी स्पष्ट केले की, सुरवातीलाच कर्करोगाचे निदान होऊन त्यावर उपचार सुरू होण्यावर भर देणे गरजेचे आहे व वेगाने पसरणारा कर्करोग कसा रोखता येणार यावर भर देणे गरजेचे आहे. कर्करोगाचे रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोहोचून त्यांना औषधे हाच एकमेव पर्याय अशी स्थिती निर्माण होऊ नये; यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगासंदर्भात प्राथमिक स्तरावरच निदान होऊन उपचार सुरू होण्यासाठी आवश्यक जागृतीवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.