म्हापसा येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात आता 'ड्रेस कोड' लागू; तोकड्या कपड्यांवर बंदी

नियमांचे उल्लंघन केल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाचा सविस्तर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
म्हापसा येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात आता 'ड्रेस कोड' लागू; तोकड्या कपड्यांवर बंदी

म्हापसा: गोव्यातील मंदिरांचे पावित्र्य आणि शिष्टाचार राखण्यासाठी म्हापसा येथील श्री लक्ष्मी नारायण संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे पावित्र्य  आणि सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थापन समितीने मंदिरात प्रवेश करणाऱ्या सर्व भाविकांसाठी विशिष्ट 'ड्रेस कोड' लागू केला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे संस्थानने स्पष्ट केले असून, तशा आशयाचे फलकही मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.



संस्थानने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, भाविकांनी मंदिरात येताना भारतीय संस्कृतीला साजेसे आणि सभ्य कपडे परिधान करणे आवश्यक आहे. विशेषतः तोकडे कपडे घालून येणाऱ्या पर्यटकांवर आणि भाविकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लिव्हलेस टॉप, लो वेस्ट जीन्स आणि आखूड टी-शर्ट घालणाऱ्या व्यक्तींना मंदिर प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहात आणि परिसरात वावरताना तिथल्या आध्यात्मिक वातावरणाचा भंग होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे समितीने म्हटले आहे.



अलिकडच्या काळात अनेक भाविक आणि पर्यटक मंदिराच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आधुनिक आणि तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले होते. यामुळे मंदिराच्या पावित्र्याला बाधा येत असल्याची तक्रार अनेक भाविकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन समितीने हा कडक निर्णय घेतला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच या नियमांची माहिती देणारा मोठा फलक लावण्यात आला असून, त्यावर कोणत्या प्रकारचे कपडे निषिद्ध आहेत याची चित्रेही स्पष्टपणे दर्शवण्यात आली आहेत. या निर्णयाचे स्थानिक भाविकांकडून स्वागत होत असून, गोव्यातील इतर प्रमुख मंदिरांच्या धर्तीवर आता म्हापशातील या ऐतिहासिक मंदिरातही शिस्त पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा