२० चिमुकल्यांसाठी दिले बलिदान; मधमाशांच्या हल्ल्यात आंगणवाडी कूकचा मृत्यू

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
२० चिमुकल्यांसाठी दिले बलिदान; मधमाशांच्या हल्ल्यात आंगणवाडी कूकचा मृत्यू

नीमच : अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या एका महिलेने स्वतःचा जीव गमावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात घडली आहे. कंचनबाई मेघवाल असे या धाडसी महिलेचे नाव असून त्या माधवाडा पंचायतमधील रानपूर गावातील अंगणवाडी केंद्रात कूक म्हणून कार्यरत होत्या.
सोमवारी अंगणवाडीतील मुले नेहमीप्रमाणे बाहेर खेळत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच कंचनबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली.
कंचनबाई यांनी तत्काळ ताडपत्री आणि चटईचा वापर करून सर्व मुलांना त्यात गुंडाळले आणि सुरक्षितपणे अंगणवाडीच्या आत नेले. मात्र या धावपळीत मधमाशांचा संपूर्ण हल्ला कंचनबाई यांच्यावर झाला. हल्ल्यानंतर कंचनबाई अंगणवाडीतच बेशुद्ध पडल्या. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल कालूनाथ आणि पायलट राजेश राठोड यांनी तातडीने कंचनबाई यांना नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी कंचनबाई यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कंचनबाई या केवळ अंगणवाडीतील केवळ कूक नव्हत्या, तर त्या ‘जय माता दी’ स्वयं-सहायता बचत गटाच्या अध्यक्षा होत्या आणि कुटुंबाचा एकमेव आधार होत्या. त्यांचे पती शिवलाल मेघवाल आजारी असून, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी कंचनबाई यांच्यावरच होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.
गाव हळहळले
मंगळवारी शवविच्छेदनानंतर पार्थिव गावात आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव भावूक झाले होते. कंचनबाई यांनी दाखवलेल्या धैर्याला गावकरी शब्दांत व्यक्त करू शकत नव्हते. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात एकच हँडपंप असून त्याच परिसरात मधमाशांचे पोळे आहे. त्यामुळे नागरिक पाणी भरायलाही घाबरत आहेत. गावकऱ्यांनी मधमाशांचे पोळे हटविण्याबरोबरच कंचनबाई यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा