कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल : संशयित प. बंगालमधील

म्हापसा : कांदोळी येथील सिल्वर सॅण्डस् सेरेनिटी या हॉटेलमधील ३.३४ लाख रुपये रोख रक्कम रिसेप्शनिस्टने चोरून नेली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मोह. इमदाद आलम (२३, रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. चोरीची घटना घडलेले हे हॉटेल एका माजी आमदारांच्या मालकीचे आहे.
चोरीची घटना दि. २७ जानेवारी रोजी उघडकीस आली. पोलिसांनी बुधवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३०६ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हॉटेलचे सरव्यवस्थापक प्रल्हाद गोवेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
चोरीस गेलेली एकूण रक्कम ३ लाख ३४ हजार ७११ रुपये आहे. दि. २४ ते २६ जानेवारी असे तीन दिवस बँक बंद असल्यामुळे या तीन दिवसांत हॉटेलच्या ग्राहकांकडून आलेली वरील रोख रक्कम ही हॉटेलच्या कॅश काऊंटरमध्ये ठेवण्यात आली होती.
मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी कॅश काऊंटर उघडला असता आत रोख रक्कम नसल्याचे कर्मचाऱ्यांना आढळून आले. तसेच हॉटेलचा फ्रन्ट ऑफिस असोसिएट (रिसेप्शनिस्ट) कर्मचारी गायब होता. त्याचा मोबाईलही बंद होता.
संशयिताचा शोधाशोध करून देखील त्याचा संपर्क होत नसल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाच्या मार्फत फिर्यादींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. संशयित आरोपी हा हॉटेलमधील रोख रक्कम चोरून आपल्या गावी पसार झाल्याचा संशय असून त्या दिशेने कळंगुट पोलीस तपास करीत आहेत.