दोन दिवसांत तीन ड्रग्ज पेडलर्सना काणकोण पोलिसांकडून अटक

दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी : नायजेरियनाकडून १.०९ लाखांचे कोकेन जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th February, 12:09 am
दोन दिवसांत तीन ड्रग्ज पेडलर्सना काणकोण पोलिसांकडून अटक

काणकोण : देवाबाग फुटबॉल मैदानावर छापा टाकून काणकोण पोलिसांनी ५. २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी अटकेत असलेल्या शॅक चालक वॉल्टर फर्नांडिस (४९, रा. चापोली-काणकोण, मूळ कोचीन-केरळ) व आगोंद येथील रेस्टॉरंट मालक सुमित मदन बांदेकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याच प्रकरणात चौकशी दरम्यान ड्रग्ज पेडलर नायजेरियन ओन्याचोलेम फ्रायडे (४७) याच्याकडून १.०९ कोटींचे २१९.९ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

काणकोण पोलिसांनी यापूर्वी संशयित वॉल्टर फर्नांडिसकडून ५.२५ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले होते. वॉल्टर याचे पाटणे आणि पाळोळे येथे प्रत्येकी दोन शॅक आणि राजबाग तारीर येथे एक नाईट क्लब आहे. तो दक्षिण गोवा किनारपट्टी भागात सक्रिय असलेला मुख्य ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वॉल्टरकडे २४.४ ग्रॅम एमडीएमए, १११.२ ग्रॅम चरस, ३.४ ग्रॅम कोकेन असे ५ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले. वॉल्टर याच्या चौकशीदरम्यान, काणकोण पोलिसांनी मंगळवारी रात्री आगोंद येथील रेस्टॉरंट मालक सुमित मदन बांदेकर याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. वॉल्टरशी सुमित बांदेकर याचा संबंध असल्याचे चौकशीत समोर आले होते.

कोळंब काणकोण येथे १९ जानेवारी २०२६ रोजी संशयित दीपू सिंग (२९, रा. पाळोळे, मूळ उत्तरप्रदेश) याच्याकडून ४.३१ लाखांचे ४३१ ग्रॅम ड्रग्ज सापडल्याने त्याला अटक केली होती. सध्या दीपू सिंग न्यायालयीन कोठडीत आहे. यानंतर २३ जानेवारी रोजी १.३५ लाखांच्या १३.५ एमडीएमएसह संशयित अरुण के. एम. (२८, रा. आगोंद, मूळ केरळ) याला अटक केली होती. अरुण हादेखील न्यायालयीन कोठडीत आहे.

बुधवारी नायजेरियन ड्रग्ज पेडलर ओन्याचोलेम फ्रायडे याला १ कोटी ९ लाख ९५ हजार किमतीच्या २१९.९ ग्रॅम कोकेनसह तारीर काणकोण येथील मोलिमा हॉटेल येथे छापा टाकत अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काणकोण पोलिसांनी केलेली ही चौथी मोठी ड्रग्जविरोधी कारवाई आहे. काणकोणचे उपविभागीय अधिकारी नीलेश राणे आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

अधीक्षक टिकमसिंग म्हणाले...

वॉल्टर फर्नांडिस फार्महाऊसवर वास्तव्यास असलेली व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे का, असा सवाल अधीक्षकांना विचारण्यात आला. यावर त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

वॉल्टर फर्नांडिस हा मूळचा केरळ येथील असून मागील २० वर्षांहून अधिक काळ तो गोव्यात वास्तव्यास असून भाडेकरू पडताळणी केली आहे का, याचाही तपास केला जाईल.

संशयितांनी या व्यवहारातून मिळवलेल्या मालमत्ताही जप्त केल्या जातील. 

हेही वाचा