नाझरी रिसॉर्टचा बेकायदेशीर भाग ३१ मेपर्यंत स्वत: पाडण्याची आमदार मायकल लोबोंची ग्वाही

उच्च न्यायालयात निवेदन : याचिका निकाली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
नाझरी रिसॉर्टचा बेकायदेशीर भाग ३१ मेपर्यंत स्वत: पाडण्याची आमदार मायकल  लोबोंची ग्वाही

पणजी : बागा येथील नाझरी रिसॉर्टचा बेकायदेशीर भाग पाडण्यात गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाला (जीसीझेडएमए) अपयश आल्यानंतर ३१ मे पूर्वी मीच हे बांधकाम पाडतो, असे निवेदन प्रतिवादी असलेल्या आमदार मायकल लोबो यांनी दिले. या निवेदनानंतर ही याचिका उच्च न्यायालयाने निकालात काढली आहे.

डेस्मंड अल्वारीस यांनी नाझरी रिसॉर्टच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आमदार मायकल लोबो यांना नोटीस बजावण्यात आली होती.

नाझरी रिसॉर्ट पाडण्याचा आदेश असतानाही ते पाडले नसल्याबद्धल डेस्मंड अल्वारीस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणासह मायकल लोबो यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते. सीआरझेडचे उल्लंघन केल्याबद्धल किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने ते पाडण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला मायकल लोबो यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर आव्हान दिले होते. राष्ट्रीय हरित लवादाने आव्हान याचिका फेटाळताना १५ दिवसांत रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हॉटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई झालेली नसल्याने डेस्मंड अल्वारीस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिके संदर्भात मायकल लोबो यांनी सुनावणीवेळी ३१ मेपर्यंत बेकायदा बांधकाम स्वत:हून पाडण्याचे निवेदन दिले. 

हेही वाचा