उधारी मागितल्याच्या रागातून बेळगावात चार तरुणांनी घेतला पानपट्टीवाल्याचा जीव

बेदम मारहाणीमुळे जागीच मृत्यू : काकती पोलिसांकडून चौघांनाही अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
47 mins ago
उधारी मागितल्याच्या रागातून बेळगावात चार तरुणांनी घेतला पानपट्टीवाल्याचा जीव

बेळगाव : तालुक्यातील गोडकेकट्टी गावातील पानपट्टी चालक यल्लाप्पा नाईक याची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे. उधारीच्या सिगरेट आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून चार तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यल्लाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चार तरुण यल्लाप्पा यांच्या दुकानावर आले होते. त्यांनी दोन सिगरेट आणि पाण्याची बाटली घेतली, मात्र त्याचे पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरून यल्लाप्पा आणि तरुणांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन या तरुणांनी यल्लाप्पा यांना अमानुषपणे मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यामुळे त्यांना अंतर्गत गंभीर इजा झाली आणि ते खाली कोसळले.

​प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे काकती पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चार आरोपींना अटक केली आहे. प्रज्वल पाटील, निखिल चौगुले, विवेक चौगुले आणि श्रीधर पाटील (सर्वजण रा. कडोली तालुका बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

चारही अटकेत असलेले संशयित आरोपी युवक आहेत. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे काकती पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा