शिवोलीत आगीत वृध्द घरमालक जखमी : ‘शॉर्ट सर्कीट’मुळे आग लागून २ लाखांचे नुकसान

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
55 mins ago
शिवोलीत आगीत वृध्द घरमालक जखमी :  ‘शॉर्ट सर्कीट’मुळे आग लागून २ लाखांचे नुकसान

म्हापसा : गोव्यातील (Goa) मार्ना, शिवोली येथे ‘शॉर्ट सर्कीट’मुळे आग लागून घर मालक (House owner) फेड्रीक डिसोझा (७३ वर्षे) हे जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत (Goa Medical College) उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले.

 बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास  ही दुर्घटना घडली. डिसोझा यांच्या घरातील ‘इर्न्व्हटर’मध्ये ‘शार्ट सर्कीट’ झाली आणि आग लागली. आगीमध्ये ‘इर्न्व्हटर’सह घरातील टीव्ही, वातानुकूल‌ित संच (एसी) खाट व इतर वस्तू जळाल्या. जखमी डिसोझा यांचे शेजारी असलेले काळजीवाहू राजेश रिवणकर यांच्या हा आगीचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी डिसोझा यांना घरातून सुखरूप बाहेर काढले. तो पर्यंत त्यांच्या खाटीला आग लागली होती व या आगीची झळ डिसोझा यांना लागून त्यांचे शरीर भाजले गेले.  

रूग्णवाहिकेतून जखमी स्थितीत त्यांना प्रथम शिवोली आरोग्य केंद्रात व तिथून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉत हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जखमी फेड्रीक डिसोझा हे आजारी असून; व्हीलचेअरवर आहेत. त्यांची मुले परदेशी आहेत. त्यामुळे त्यांनी शेजारी रिवणकर यांच्यावर वडील डिसोझा यांची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे.

घटनेची माहिती मिळाताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यापुर्वीच जखमीला इस्पितळात हलवण्यातआले होते. दलाचे उपअधिकारी ओंकार कारबोटकर, जयेश कानोळकर, आकाश सावंत, गिरीश गावस व तुकाराम रेडकर या जवानांनी आग विझवली. हणजूण पोलीस हवालदार विशाल गावस यांनी पंचानामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा