हळदीनंतर नवरीसोबत जल्लोष, लग्नाआधीच पोलीस नवरदेव बेपत्ता; नांदेडमधील रहस्यमय घटना

नवरा गायब असल्याची पोलिसांत तक्रार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
हळदीनंतर नवरीसोबत जल्लोष, लग्नाआधीच पोलीस नवरदेव बेपत्ता; नांदेडमधील रहस्यमय घटना

नांदेड (Nanded) : लग्नाची (Wedding)  हळद झाली. नंतर नवरदेव नवरीसोबत तुफान नाचला. लग्नाचा मंडप सजला होता, सनई–चौघड्यांचे सूर घुमत होते. अवघ्या काही तासांतच अक्षता पडणार होत्या. मात्र, बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. आता नेमके करावे काय हा प्रश्न नवरा व वधूच्या कुटुंबियांना पडला. नंतर हे प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचले. नवरदेवाच्या वडिलांनी मुलगा गायब असल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली. 

पोलीस असलेल्या नवरदेवाचे अशा पद्धतीने गायब होणे चर्चेचा विषय बनला. वधूच्या कुटुंबावर तर जणू आभाळच कोसळले. महाराष्ट्रातील (Maharashtra)  नांदेड येथे घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुख्य म्हणजे नवरदेव व वधू दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. 

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या योगेश दत्ता घुगे (नागेशवाडी, किनवट येथील रहिवासी)  यांचा विवाह किनवट तालुक्यातील मदनापूर येथील एका युवतीशी ठरला होता. युवतीही पोलीस दलात कार्यरत होती. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने वर्षभरापूर्वी विवाह निश्चित करण्यात आला होता. मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५४ वाजण्याच्या मुहूर्तावर विवाह समारंभ ठरला होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम होऊन लग्नाच्या काही तासांपूर्वीच नवरदेव गायब झाला. नवरदेव नेमका गेला कुठे? घडले काय? यासंदर्भात अस्पष्टता असून, पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. 

हेही वाचा