पर्वरीतील व्यक्तीला ४.६६ लाखांचा गंडा

एसबीआयचा अधिकारी भासवून एचडीएफसी खाते केले रिकामी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पर्वरीतील व्यक्तीला ४.६६ लाखांचा गंडा

म्हापसा : पर्वरी येथील एका वृद्ध व्यक्तीला एसबीआय बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून नेट बँकिंगच्या आधारे ४.६६ लाखांना गंडा घालून त्यांचे बँक खाते रिकामी करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर क्राईम कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा फसवणुकीचा प्रकार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी १.२० वा. सुमारास घडला होता. याप्रकरणी अशोक भेंब्रे (रा. पत्रकार कॉलनी, पर्वरी व मूळ कुडचडे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

घटनेच्या दिवशी अज्ञात संशयिताने फिर्यांदींशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण एसबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांना एक लिंक पाठवल्याचे सांगून फिर्यादींना ओटीपी पाठवली. नंतर नेट बँकिंगच्या आधारे तक्रारदाराच्या एचडीएफसी बँक खात्यातून प्रथम ९५ हजार रक्कम आणि नंतर ३ लाख ७१ हजार ५९९ रक्कम मिळून एकूण ४ लाख ६६ हजार ५९९ रुपये रक्कम आपल्या खात्यात संशयिताने हस्तांतरित केली.

या डिजिटल फसवणूक प्रकरणी पर्वरी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब हे करीत आहेत. 

हेही वाचा