एएनसीकडून अफनान घोरी याला अटक : न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) गणेशपुरी-म्हापसा येथील एका घरावर छापा टाकून ६५.५४ लाख रुपये किमतीचे कोकेन, एक्टसी, गांजा जप्त केले. या प्रकरणी एएनसीने सराईत ड्रग्ज पेडलर अफनान घोरी (२१) याला अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जामिनावर सुटका झालेला ड्रग्ज तस्कर अफनान घोरी पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच तो मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, मागील अनेक दिवस एएनसीचे पथक त्याच्या मागावर होते. याच दरम्यान अफनान घोरी, गणेशपुरी - म्हापसा येथे राहत असल्याची माहिती समोर आली.
पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सगुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साहीन शेट्ये व इतर पथकाने बुधवार, ४ रोजी रात्री १० ते गुरुवार ५ रोजी सकाळी ६.३० दरम्यान वरील घरावर छापा टाकला. त्यावेळी पथकाने अफनान घोरी याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घराची झडती घेतली असता, पथकाने १२७.७ ग्रॅम कोकेन, १६.८ ग्रॅम एक्टसी आणि २१ ग्रॅम गांजा जप्त केला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ६५ लाख ५४ हजार ५० रुपये आहे. त्यानंतर उपनिरीक्षक साहीन शेट्ये यांनी अफनान याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २१(सी), २२(सी), २२(बी), २०(बी)(ii)(ए) आणि आर डब्ल्यू २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
ड्रग्जप्रकरणी घोरी होता जामिनावर
एएनसीने १६ एप्रिल २०२३ रोजी पहाटे म्हापसा येथील डांगी कॉलनीत छापा टाकून सराईत ड्रग्ज तस्कर अफनान घोरी याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून पथकाने १.९० लाख रुपये किमतीचे १८.४० ग्रॅम मेथाफेमेथामाईन ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने संशयिताला २० हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला होता.