केवळ बिट्स पिलानीमध्येच विद्यार्थी मृत्यू का होतात ?

आपकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; चौकशीची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
केवळ बिट्स पिलानीमध्येच विद्यार्थी मृत्यू का होतात ?

जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांना निवेदन देताना आमदार क्रूझ सिल्वा, वाल्मिकी नाईक व प्रशांत नाईक.

मडगाव : बिट्स पिलानी संस्थेत सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून, हे केवळ याच संस्थेत का होते? नैराश्यातून हे होते का, आणखी काही गोष्टींमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, याची चौकशी व्हावी. कुणाला पाठीशी घालण्याचा प्रकार नको. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च शिक्षण संस्थांतील नियमावलीची अंमलबजावणी व्हावी, यासाठी यापूर्वीही दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले होते. या उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली असता, निर्देशाचे पालन झाल्यास बिट्स पिलानीत विद्यार्थी मृत्यू प्रकरण का घडले, असा सवाल करत योग्य व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपकडून करण्यात आली आहे. आपचे राज्य अध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, प्रशांत नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांची भेट घेतली.
राज्यात एनआयटी आणि आयआयटी सारख्या नामांकित संस्था येत असताना अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाचा सखोल तपास करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी वाल्मिकी नाईक यांनी यावेळी केली.      

हेही वाचा