दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा अपयशाचा धक्का : मनधाना–व्होलची विक्रमी भागीदारी

वडोदरा : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा आली. अंतिम सामन्यात २०३ धावांचे आव्हान उभे करूनही दिल्लीला विजय मिळवता आला नाही. स्मृती मनधाना आणि जॉर्जिया व्होल यांच्या ऐतिहासिक भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करत दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले. हा दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा अंतिम सामन्यातील पराभव ठरला असून, यापूर्वीही त्यांना आरसीबीकडूनच जेतेपदाच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत संथ झाली. पहिल्या तीन षटकांत केवळ ९ धावा निघाल्या. लॉरेन बेलच्या अचूक माऱ्यामुळे लिझेल ली अडचणीत आली. मात्र, सयाली साठगरेच्या एका षटकात सलग षटकार मारत लीने आक्रमण सुरू केले.
शेफाली वर्माला फारसा वेळ खेळता आला नाही, पण त्यानंतर लीने श्रेयांका पाटीलवर हल्ला चढवत पॉवरप्लेनंतरच्या षटकात १९ धावा काढल्या. चार षटकांत ६३ धावा काढत दिल्लीने सामन्यावर पकड मजबूत केली.
नादिन डी क्लार्कने लीला ३७ धावांवर बाद करत आरसीबीला महत्त्वाचे यश मिळवून दिले. मात्र, जेमिमा रोड्रिग्जने आक्रमक फलंदाजी करत केवळ ३२ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. १० षटकांनंतर दिल्ली २ बाद ९४ अशा मजबूत स्थितीत होती.
जेमिमा बाद झाल्यानंतर चिनेल हेन्रीने शेवटच्या षटकांत तुफानी फलंदाजी केली. अखेरच्या षटकात तिने चार चौकार आणि एक षटकार मारत सामन्याला वेगळे वळण दिले. अखेरीस ४ बाद २०३ अशी भक्कम धावसंख्या दिल्लीने उभी केली.
२०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणे या मैदानावर आजवर कुणालाच जमले नव्हते. शिवाय, डब्ल्यूपीएलच्या इतिहासात फक्त एकदाच असा पाठलाग यशस्वी झाला होता. त्यामुळे दिल्लीला विजयाची पूर्ण खात्री वाटत होती. आरसीबीची सुरुवातही खराब झाली. ग्रेस हॅरिस लवकर बाद झाली. मात्र, त्यानंतर मैदानावर घडले ते इतिहासात कोरले गेले. स्मृती मनधाना आणि जॉर्जिया व्होल यांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास ढासळवला. पॉवरप्लेमध्ये आरसीबीने ५९ धावा काढल्या. दहा षटकांनंतर संघाची धावसंख्या १ बाद १०० होती आणि सामना आरसीबीच्या बाजूने झुकू लागला.
मनधाना आणि व्होल यांनी डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च १६५ धावांची भागीदारी रचली. दोघींनीही अर्धशतके झळकावली. स्नेह राणा, मरीझान कॅप, शिरी चरणी यांच्याकडून धावा सतत निघत राहिल्या.
शेवटच्या षटकांतील थरार
मिन्नू मणीने व्होलला बाद करत थोडी आशा निर्माण केली. त्यानंतर नंदिनी शर्माने ऋचा घोषला, तर चिनेल हेन्रीने मनधानाला बाद करत सामना क्षणभर रंगवला. मात्र, पुढील चेंडूवर राधा यादवचा झेल सुटला आणि हाच क्षण दिल्लीसाठी निर्णायक ठरला. अंतिम षटकात १० धावांची गरज असताना राधा यादवने सलग दोन चौकार मारत सामना संपवला आणि आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पुन्हा एकदा दिल्लीच्या पदरी निराशा
२०३ धावा करूनही पराभव स्वीकारावा लागल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ही रात्र अत्यंत वेदनादायक ठरली. दिल्ली कॅपिटल्स चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीही त्यांना आरसीबीकडूनच जेतेपदाच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
डब्ल्यूपीएलचे विजेते
२०२३ – मुंबई इंडियन्स
२०२४ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०२५ – मुंबई इंडियन्स
२०२६ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
डब्ल्यूपीएलमधील सर्वाधिक यशस्वी धावसंख्या पाठलाग
२०४ धावा – बंगळुरू विरुद्ध दिल्ली, वडोदरा, २०२६
२०२ धावा – बंगळुरू विरुद्ध गुजरात, वडोदरा, २०२५
१९३ धावा – मुंबई विरुद्ध गुजरात, डी. वाय. पाटील, २०२६
१९१ धावा –मुंबई विरुद्ध गुजरात, दिल्ली, २०२४
१८९ धावा – बंगळुरू विरुद्ध गुजरात, ब्रेबॉर्न, २०२३
बंगळुरूमधील सर्वाधिक सामन्यांची एकूण धावसंख्या
४३८ धावा – बंगळुरू विरुद्ध युपी, लखनौ, २०२५
४१४ धावा – दिल्ली विरुद्ध गुजरात, नवी मुंबई, २०२६
४०७ धावा – बंगळुरू विरुद्ध दिल्ली, वडोदरा, २०२६ अंतिम*
४०४ धावा – गुजरात विरुद्ध युपी, नवी मुंबई, २०२६
४०३ धावा – गुजरात विरुद्ध बंगळुरू, वडोदरा, २०२५
एका डब्ल्यूपीएल हंगामातील सर्वाधिक धावा
५२३ धावा – नॅट सायव्हर-ब्रंट (मुंबई), २०२५
३७७ धावा – स्मृती मनधाना (बंगळुरु), २०२६*
३७२ धावा – एलिस पेरी (बंगळुरु), २०२५
३४७ धावा – एलिस पेरी (बंगळुरु), २०२४
३४५ धावा – मेग लॅनिंग (दिल्ली), २०२३
एका डब्ल्यूपीएल हंगामातील सर्वाधिक बळी
१८ बळी – अमेलिया केर (मुंबई), २०२५
१८ बळी – हेली मॅथ्यूज (मुंबई), २०२५
१७ बळी – सोफी डिव्हाइन (गुजरात), २०२६*
१७ बळी – नंदिनी शर्मा (दिल्ली), २०२६*
१६ बळी – सोफी एक्लेस्टोन (युपी), २०२३
१६ बळी – हेली मॅथ्यूज (मुंबई), २०२३
अंतिम सामन्यात दिल्लीचे अपयश
२०२३ – मुंबई विरुद्ध ७ विकेट्सने पराभव
२०२४ – बंगळुरु विरुद्ध ८ विकेट्सने पराभव
२०२५ – मुंबई विरुद्ध ८ धावांनी पराभव
२०२६ – बंगळुरु विरुद्ध ६ विकेट्सने पराभव
डब्ल्यूपीएलमधील मैदानानुसार सर्वाधिक विजय
७ विजय – मुंबई, ब्रेबॉर्न मैदान (८ सामने)
६ विजय – दिल्ली, वडोदरा (९ सामने)
६ विजय – दिल्ली, बंगळुरू (८ सामने)
६ विजय – मुंबई, नवी मुंबई (११ सामने)
एका डब्ल्यूपीएल हंगामातील सर्वाधिक विजय
८ विजय – मुंबई, २०२३ (१० सामने)
७ विजय – मुंबई, २०२५ (१० सामने)
७ विजय – बंगळुरु, २०२६* (९ सामने)