पोर्टल अद्ययावत करण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्यासोबत विविध खात्यांचे अधिकारी.
मडगाव : केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजने’साठी देशातील १०० निवडक जिल्ह्यांमध्ये दक्षिण गोव्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, योजनेशी संबंधित सर्व उपक्रम आणि माहिती विहित वेळेत पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या कडक सूचना दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी दिल्या आहेत.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना गावकर यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत शेतीचे आधुनिकिकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्ह्याच्या विशिष्ट गरजा ओळखून केंद्र पुरस्कृत योजनांचे घटक निश्चित करणे आणि राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विविध खात्यांमध्ये समन्यवय आवश्यक
दक्षिण गोव्याची निवड देशातील प्रमुख कृषी जिल्ह्यांत झाल्याने या क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध खात्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी, जलस्रोत खाते, भूमी अभिलेख, मत्स्यव्यवसाय विभाग आणि नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.