ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ‘हिल टॉप’, ‘सालुद’ दोन महिन्यांसाठी बंद

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका : हिल टॉपला २ लाख, सालुदला १.४० लाखांचा दंड

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th February, 11:55 pm
ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ‘हिल टॉप’, ‘सालुद’ दोन महिन्यांसाठी बंद

म्हापसा : ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेत, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हणजूण येथील नाईट क्लब ‘हिल टॉप बार अँड रेस्टॉरंट‘ आणि ‘सालुद’ यांना दिलेली ‘संचालनाची परवानगी’ रद्द केली. या आस्थापनांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तत्काळ कामकाज थांबवण्याचे आदेश दिले.

पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलम ५ अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांनुसार, मंडळाने हिल टॉपला २ लाख आणि सालुद या रेस्टॉरंट-कम-नाईटक्लबला १.४० लाख रुपयांची पर्यावरणीय भरपाईचे आदेश दिले आहेत.


मंडळाच्या आदेशानुसार, १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील रिअल-टाइम ऑनलाइन ध्वनी निरीक्षण डेटाच्या विश्लेषणानंतर, हिल टॉप बार अँड रेस्टॉरंट आणि सालुद किचन अँड लाउंजच्या व्यवस्थापनाला २१ जानेवारी २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या डेटामधून असे दिसून आले की, आस्थापनांमध्ये नोंदवलेली ध्वनी पातळी वारंवार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होती. याव्यतिरिक्त, अनेक दिवसांपासून ऑनलाइन ध्वनी निरीक्षण केंद्राने कोणताही डेटा प्रसारित केला नाही.


हिल टॉपच्या व्यवस्थापनाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीसला उत्तर सादर केले होते. तथापि, मंडळाला ते उत्तर असमाधानकारक वाटले. मंडळाने म्हटले आहे की, हिल टॉप हा त्या भागातील ध्वनी प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. मात्र, सालुदने कारणे दाखवा नोटीसला प्रतिसाद दिला नाही.

१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील डेटाच्या पुढील पडताळणीत असे दिसून आले की, पूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावूनही, १७, १८ आणि २३ जानेवारी रोजी पुन्हा रिअल-टाइम ध्वनी डेटा प्रसारित केला गेला नाही. या सततच्या उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर, मंडळाने दोन्ही रेस्टॉरंटना दिलेली ‘संचालनाची संमती’ मागे घेतली आणि दोन्ही आस्थापने दोन महिन्यांसाठी तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यावरणीय भरपाई निर्देश मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत.

पार्टी बंद करून ग्राहकांना काढले बाहेर

‘हिलटॉप’मध्ये गुरुवारपासून चार दिवस पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी पहिल्याच दिवशी बंद पाडून अधिकाऱ्यांनी सर्व ग्राहकांना तिथून बाहेर काढले आणि नंतर क्लब सील केला. 

हेही वाचा