टॅक्सी चालकांनी आतापर्यंत खासगी अॅपना विरोध करून आपलेच नुकसान करून घेतले आहे. अजून वेळ गेलेली नाही. गोव्यातील टॅक्सी चालकांनीही सहकारी तत्त्वावर स्वतंत्र अॅप तयार करण्याचा विचार करायला हवा. अन्यथा या स्पर्धेत गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय मागे पडणार आहे.

गोव्यात टॅक्सी अॅप असावे, ही प्रवाशांची मागणी असूनही, गोव्यातील टॅक्सी चालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे ही सेवा यशस्वी होऊ शकली नाही. ‘गोव्यात टॅक्सी चालक लुबाडतात,’ असा थेट आरोप गोव्यात येणारे पर्यटक करत असतात. इतर राज्यांमध्ये जे अनुभव येत नाहीत ते गोव्यातील दौऱ्यात येतात, असा पर्यटकांचा आरोप असतो. अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरासाठी हजारो रुपये मागितले जातात, असा दावा पर्यटक करतात आणि सोशल मीडियावर गोव्यातील टॅक्सी व्यवसायावरच शेकडो व्हिडीओ उपलब्ध आहेत. टॅक्सी भाड्यावरून प्रवाशांशी हुज्जत घालणे, प्रसंगी हाणामारी करणे, आणि प्रवाशाने दुसरी टॅक्सी मागवल्यास त्यांना वेठीस धरणे; अशा प्रकारांमुळे काही टॅक्सी चालकांकडून संपूर्ण व्यवसायाची आणि गोव्याच्या पर्यटनाची बदनामी होत आहे. सरकारने अनेकदा सरकारी अॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. खासगी अॅपना गोव्यात परवानगी द्यावी, असाही प्रयत्न केला. टॅक्सी चालकांनाही तुमचे स्वतःचे अॅप तयार करा सरकार त्यासाठी मदत करेल, असाही प्रस्ताव दिला गेला. पण मुळात कुठलेच अॅप नको, अशी भूमिका घेणाऱ्या टॅक्सी चालकांमुळे गोव्यात कुठलेही अॅप व्यवस्थित चालू शकले नाही. ‘गोवा माईल्स’ आणि ‘गोवा टॅक्सी’ अॅप कार्यरत आहेत. ‘गोवा माईल्स’ला सरकारने परवानगी दिली होती जे अॅप सरकारला काही प्रमाणात महसूल देते, तर ‘गोवा टॅक्सी’ हे अॅप सरकारचे आहे. पण ‘ओला’, ‘उबर’सारख्या कंपन्यांना गोव्यात येण्यास टॅक्सी चालकांनी विरोध केला. ‘गोवा माईल्स’लाही विरोध आहेच, पण तो विरोध पचवून अशा अॅपवरील आधारित टॅक्सी सेवा गोव्यात सुरू आहेत. गोव्यात पारंपरिकरित्या चालू असलेल्या टॅक्सी व्यवसायावर काही ठराविक लोकांचे नियंत्रण आहे. काहींनी शेकडोंच्या संख्येने टॅक्सी घेतल्या आहेत, त्यांच्याकडून अॅपसारख्या गोष्टींना कायम विरोध केला जातो. अशा काही लोकांनीच गोव्यातील टॅक्सी व्यवसाय बदनाम केला आहे. प्रामाणिक टॅक्सीवालेही त्यांना घाबरतात.
अॅपसारख्या सेवा आल्या तर टॅक्सींचा वापर सध्यापेक्षा कित्येक पटीने वाढू शकेल. चांगल्या दरात टॅक्सी सेवा उपलब्ध झाली, तर अनेक लोक ही सेवा वापरू शकतात. गोव्यात कुठेही जाण्यासाठी टॅक्सी मागवली, तर त्याचा दर आणि अॅपवरील टॅक्सीचा दर यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अॅपवरील टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार गोव्यात घडत असतात. त्यांच्यासोबत पर्यटकांनाही लक्ष्य केले जाते. त्यामुळेच गोव्याची सर्वत्र बदनामी होत आहे. या गोष्टींना काही टॅक्सी चालकच जबाबदार आहेत. गोव्यातील टॅक्सी चालकांनी सहकार तत्त्वावर अॅपवरील टॅक्सी सेवा सुरू केली असती, तर त्याचा मोठा फायदा या व्यवसायातील लोकांना झाला असता. व्यवसायाचा विस्तार झाला असता. पण टॅक्सी मालकांच्या आणि चालकांच्या आडमुठेपणामुळे गोव्यात अॅपवरील टॅक्सी सेवांचा चांगला प्रसार झालेला नाही किंवा या सेवांचा जमही बसलेला नाही.
आता केंद्र सरकारच्या पाठिंब्याने सहकार तत्त्वावर 'भारत टॅक्सी' ही अॅपवर आधारित टॅक्सी सेवा सुरू केल्यामुळे देशात नव्या प्रवासी टॅक्सीचा अध्यायच सुरू झाला आहे, असे म्हणावे लागेल. केंद्र सरकारचा पाठिंबा असलेल्या या सेवेचे रितसर उद्घाटन झाले आहे. सहकारावर आधारित भारतातील ही पहिली टॅक्सी सेवा आहे. केंद्राच्या दाव्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेतून सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. जून २०२५ मध्ये या 'भारत टॅक्सी'ची स्थापना झाली होती. दोन वर्षांत देशातील सर्व राज्यांमध्ये याचा विस्तार होणार आहे. त्यामुळे गोव्यातही लवकरच ‘भारत टॅक्सी’ दिसू लागेल. केंद्रानेच पुढाकार घेऊन ही सेवा सुरू केल्यामुळे टॅक्सी चालकांसमोर या अॅपमध्ये येण्यावाचून पर्याय राहणार नाही. एव्हाना गोव्यातील टॅक्सी चालकांनी आपल्या स्वतंत्र अॅपची सेवा सुरू केली असती, तर आज ‘भारत टॅक्सी’ अॅपला स्पर्धा करणे टॅक्सी चालकांना सोपे गेले असते. ओला, उबरला टॅक्सी चालकांनी विरोध केला. जेवढे अॅप गोव्यात आले असते, तेवढी स्पर्धा वाढली असती आणि प्रवाशांना चांगल्या दरात टॅक्सीचे पर्याय खुले झाले असते. टॅक्सी चालकांनी आतापर्यंत खासगी अॅपना विरोध करून आपलेच नुकसान करून घेतले आहे. अजून वेळ गेलेली नाही. गोव्यातील टॅक्सी चालकांनीही सहकारी तत्त्वावर स्वतंत्र अॅप तयार करण्याचा विचार करायला हवा. अन्यथा या स्पर्धेत गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय मागे पडणार आहे.