१.१९ कोटी रुपयांचा घोटाळा : सहा जणांविरोधात ७,००० पानी आरोप

पणजी : सडा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या झुआरीनगर येथील शाखेत तत्कालीन कर्मचाऱ्यांनी १.१९ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणात सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागाने न्यायालयात ७ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत मेरशी येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए) आरोपपत्र दाखल केले आहे.
वास्को येथील सडा अर्बन सहकारी सोसायटी लिमिटेडचे तत्कालीन सरव्यवस्थापक प्रतोश लोटलीकर यांनी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी झुआरीनगर शाखेच्या माजी व्यवस्थापक उमा एन. होन्दाद आणि साथीदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. संशयित होन्दाद यांची २० एप्रिल २०२० रोजी सोसायटीच्या झुआरीनगर शाखेत व्यवस्थापकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर होन्दाद हिने तिच्या साथीदारांच्या मदतीने सोसायटीत कायम ठेवी ठेवलेल्या १ कोटी १९ लाख ४२ हजार ७१७ रुपयांच्या रकमेवर बनावट कर्ज वितरण करून सोसायटीला तसेच संबंधित ग्राहकांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, वेर्णा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर तत्कालीन निरीक्षक दायगो ग्रासियस यांनी दोघा संशयितांना अटक करून कारवाई केली. तसेच या संदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दरम्यान, वरील प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत कारवाई सुरू केली. त्यात तत्कालीन व्यवस्थापक उमा हिने आपल्या पदाचा गैरवापर करून इतरांच्या संगनमताने बनावट कर्ज खाते उघडून, सोने तारण कर्जाची प्रकरणे दाखवून, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून सोसायटीच्या बँक खात्यातून पैसे काढले. या सर्व गैरव्यवहारातून मिळालेला निधी त्यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यात वळवला. त्यानंतर सदर निधी वैयक्तिक खर्च व मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचे समोर आले.
उमाने खरेदी केलेले दुकान, घर तात्पुरते जप्त
ईडीने जुलै २०२५ मध्ये उमा हिने खरेदी केलेले वास्को शहरातील ‘वास्को टाइम्स’ नावाचे एक व्यावसायिक दुकान आणि एक रहिवासी घर तात्पुरते जप्त केले. दरम्यान, तपास पूर्ण करून ईडीने उमा हिच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.