देश तंत्रज्ञानात अग्रेसर होण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज!

डॉ. अनिल काकोडकर : कुंकळ्ळीत एनआयटी गोवाचा पदवीदान समारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
43 mins ago
देश तंत्रज्ञानात अग्रेसर होण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज!

मडगाव : देशाच्या औद्योगिक क्षेत्रात मूल्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येचा दबाव, जागतिक स्पर्धा यासाठी देशांतर्गत बाजारपेठेत स्थान टिकवण्यासाठी उच्च दर्जाचे मानवी संसाधन आणि तांत्रिक प्रगती गरजेची आहे. त्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवाचा ११ वा पदवीदान समारंभ कुंकळ्ळी येथील कॅम्पसमध्ये पार पडला. या सोहळ्यात १६२ बी.टेक, ३० एम.टेक आणि २४ पीएचडी अशा एकूण २१६ विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. संस्थेचे संचालक प्रो. ओमप्रकाश आर. जयस्वाल यांनी माहिती दिली की, यंदा १०८ कंपन्यांनी कॅम्पसमध्ये हजेरी लावली. बी. टेक विद्यार्थ्यांसाठी २१.६ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले, तर सरासरी पॅकेज ८.१० लाख रुपये राहिले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात प्रत्येकी २० जागांसह नवीन एमएस्सी अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष बी. राजा गोपाल नायडू यांनी भूषवले, तर ‘ग्रोथ ग्रेव्ही’चे संस्थापक आणि संस्थेचे माजी विद्यार्थी वीरेश वझीराणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी पदवीधरांना संबोधित करताना डॉ. काकोडकर यांनी सांगितले की, एनआयटी गोवा ही एनआयटीच्या शाखांतील नवी शाखा असून नव्या संकल्पना जगासमोर आणण्याची संधी येथे आहे. येथून बाहेर पडणार्‍या अभियंत्यांना आता नव्या जगात अनेक संधी आहेत. त्यासाठी वेळोवेळी आपल्या बौद्धीक क्षमतेचे ‘अपडेशन’ आवश्यक आहे. जगात अनेक समस्या व आव्हाने समोर येत असताना व अनेक संधी मिळण्याच्या काळात आपण सर्व अभियंता म्हणून पुढे आले आहात. वातावरण बदलाचे आव्हान, हवामानाचा र्‍हास, नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख व तंत्रज्ञानात सातत्याने होणारा बदल, मानवी दुरावा व असहिष्णुता वाढत असताना दिसत आहे. भविष्य घडवण्यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्नशील राहावे.
केवळ ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग करून नाविन्यपूर्ण उत्पादने आणि प्रक्रिया विकसित केल्या पाहिजेत, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडेल. परकीय तंत्रज्ञान सुरुवातीला वेग देऊ शकते, पण शाश्वत प्रगतीसाठी स्वदेशी तंत्रज्ञान मजबूत असणे आवश्यक आहे. पदवीधरांना भविष्यातील आव्हानांना न घाबरता त्यांचे संधीत रूपांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले. जग अशाच लोकांचे आहे, जे आव्हाने स्वीकारण्यास तयार आहेत. आपल्या जीवनशैलीशी आणि नैसर्गिक संसाधनांशी सुसंगत अशी शिक्षण पद्धती आपण अवलंबली पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागेल. पदवीधरांना केवळ नोकरी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता संशोधन आणि नवनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. भारताला तंत्रज्ञानातील नेता बनवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
विरेश वझीराणी यांनी, पदवीधर विद्यार्थ्यांनी यापुढेही अथक परिश्रम करावे, चौकटीबाहेरील विचार असावेत व जीवनातील बॅलन्सही राखावा. महाविद्यालयाबाहेरील जगाला अगदी परफेक्ट अभियंता नको आहेत, तर त्यांना विविध संकल्पना व विचारांनी भरलेले व जे प्रामाणिकपणे काम करु शकतात असे अभियंता हवे असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करावी
अभियंत्यांनी आपले ज्ञान केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता, ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि सामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी वापरावे, भारताच्या ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करत, आत्मनिर्भर भारत मोहिमेत योगदान देण्याची जबाबदारी नव्या पिढीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थी राहून नवीन कौशल्ये आत्मसात करत राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

हेही वाचा