बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवल्याप्रकरणी ‘आरव फार्मा’ कंपनीविरुद्ध गुन्हा

पणजी पोलिसांकडून तपास सुरू; आरोग्य खात्याची केली फसवणूक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
57 mins ago
बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवल्याप्रकरणी ‘आरव फार्मा’ कंपनीविरुद्ध  गुन्हा

पणजी : बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध (Spurious snake anit venom)  पुरवून आरोग्य खात्याची (Health Department)  फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी (Panjim Police) सांताक्रूझ येथील ‘आरव फार्मा’ (Aarav Pharma) या औषध वितरण कंपनीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. 

यासंदर्भात आरोग्य खात्याच्या मेडीसीन विभागाचे उपसंचालक डॉ. सहीन सईद यांनी खात्याच्या वतीने पणजी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत फार्मा कंपनीने बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषधे पुरवून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. सुमारे ४.९ लाख रुपयांच्या या व्यवहरात आरोग्य खात्याची फसवणूक करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

एका वेगळ्याच कंपनीची लेबल्स वापरून ही बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषधे पुरवण्यात आल्याचे तपासात पुढे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक व  कॉपी राईट कायद्याखाली गुन्हा नोंदवल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. केंद्रीय व राज्य अन्न व औषध प्रशासनाने हल्लीच संशयास्पद सर्पदंश प्रतिबंधक औषधांचा पू्र्ण साठा जप्त करून नुमने तपासणीसाठी पाठवले होते. 

तेलंगणातील मूळ कंपनीने केली होती तक्रार 

हे औषध आरव कंपनीने आरोग्य खात्याला पुरवले होते. मात्र, तेलंगणा येथील मूळ कंपनीने केंद्रीय अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) संशयास्पद सर्पदंश प्रतिबंधक औषधे आपल्या कंपनीची लेबल्स चिकटवून आरोग्य खात्याला पुरवल्याची तक्रार केली होती.  


हेही वाचा