फोमेंतो एज्युकेशनल चॅरिटेबल सोसायटीच्या दि पर्वरी शाळेचा वार्षिक दिवस उत्साहात साजरा

पणजी : पालक आणि शिक्षकांनी लहान मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करावी; असे आवाहन शिक्षण खात्याच्या सहाय्यक संचालक फ्रिदा आंद्रादे यांनी केले. शुक्रवारी पणजीत फोमेंतो (Fomento Educational Charitable Society) एज्युकेशनल चॅरिटेबल सोसायटीच्या दि पर्वरी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या (The Porvorim English School) वार्षिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ज्यो लुईस, अचमना लुईस, निवेदिता श्रीवास्तव, नीला जयवंत, डॉ. एडगर डिसोझा, फ्रान्सिस्को डिसोझा, दिलीप वेर्लेकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फॅशन शो आदींद्वारे आपले कलागुण दाखवले.

आंद्रादे म्हणाल्या की, सध्याची लहान मुले मोबाईल मध्ये अधिक व्यस्त असतात. त्यांची ही सवय बदलणे आवश्यक आहे. त्यांनी पुस्तकांशी दोस्ती केल्यास त्यांना ज्ञान मिळेल. तसेच आयुष्यात पुढे जाण्यासाठी देखील पुस्तके उपयुक्त ठरतील. पुस्तके असल्यास मुले मोबाईलमध्ये अधिक वेळ वाया घालवणार नाहीत. आज विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुण प्रदर्शनातून त्यांचा भोळेपणा, पारदर्शकता त्याचसोबत शिस्त देखील पाहायला मिळाली. येथे सदर केलेल्या प्रत्येक कलेमध्ये काहीतरी संदेश देण्यात आला ही गोष्ट महत्त्वाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांसहीत शिक्षकांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे.

नीला जयवंत म्हणाल्या की, शाळेतर्फे दरवर्षी असा उपक्रम राबवला जातो. आम्ही शैक्षणिक अभ्यासक्रमासह अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतो. यातून त्यांना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते. आज विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमातून त्यांची ऊर्जा पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा सराव जानेवारी महिन्यापासून सुरू होता. यासाठी शिक्षकांनी देखील खूप परिश्रम घेतले. मुलांना चांगले शिक्षण देऊन भविष्यात देशाचा जबाबदार नागरिक बनवणे; ही आमची जबाबदारी आहे.
चांगल्या शिक्षणासाठी कटिबद्ध
ज्यो लुईस म्हणाले की, या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज चांगल्या पदावर काम करत आहेत. ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. फोमेंतो एज्युकेशनल चॅरिटेबल सोसायटीतर्फे आम्ही चांगले शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत.