
पणजी : चोडण येथे २४ तास सेवा देणारे आपत्कालीन आरोग्य केंद्र (Emergency Heath Center) सुरू करण्याचा आदेश गोवा मानवाधिकार आयोगाने (Goa Human Rights Commission) आरोग्य खात्याच्या संचालकांना दिला आहे. चोडण बेटावर आरएमडी असले तरी २४ तास आरोग्य सेवेची सोय उपलब्ध नसल्याने लोकांची गैरसोय होते; अशी तक्रार युवराज मांद्रेकर यांनी केली होती. या तक्रारीवर अहवाल देताना आयोगाने हा आदेश दिला आहे.
गोवा मानवाधिकार आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष डेस्मंड डिकोस्ता आणि सदस्य प्रमोद कामत यांनी हा आदेश दिला. चोडण येथे आरोग्य केंद्र आहे; मात्र रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्याने २४ तास सेवा उपलब्ध होत नाही, अशी तक्रार चोडणचे ग्रामस्थ युवराज मांद्रेकर यांनी केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली.
पूर्ण वेळ डॉक्टर नसल्याने आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही, अशी त्यांची तक्रार होती. चोडण येथून पणजीला जायचे असल्यास रात्री फेरी बोटी मुळे डॉक्टरकडे पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे चोडणच्या लोकांना रात्रीच्या वेळी डिचोलीला जावे लागते. चोडण येथून डिचोली दूर आहे. त्यामुळे गंभीर आजारी असलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
आरोग्य संचालकांनी चोडण आरोग्य केंद्रात (आरएमडी) आपत्कालीन सेवा केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. वर्षाला ४५ लाखांच्या खर्चासहीत एकंदर ६७ लाख ७६ हजार रुपये खर्च येणार. हा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्य संचालकांनी सुनावणी वेळी दिली. ९० दिवसांत आपत्कालीन आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याचा आदेश आयोगाने दिला.