ध्वजारोहणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

नगराध्यक्ष शिरोडकर : मडगाव पालिका बैठकीत निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
40 mins ago
ध्वजारोहणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

मडगाव : पालिकेतील अधिकृत ध्वजारोहण समारंभास अनुपस्थित राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मडगाव नगरपालिकेने घेतला असून, पुढील दोन-तीन दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.
मडगाव पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिका सभागृहात पार पडली. यानंतर नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले की, सोनसडो येथील सर्व्हे क्रमांक १९६/१ मधील संपादित जमिनीसाठी फाब्रिका राय चर्चला जादा नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शहरात २५ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. काही नगरसेवकांनी ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केलेली होती. याआधी घेण्यात आलेल्या तीन कचरा कॉम्पॅक्टर्समध्ये सुधारणा करण्यावर चर्चा होईल. केंद्र सरकारकडून मिळालेल्या ३० लाख रुपयांच्या निधीतून एक नवीन नाईट सॉईल टँकर खरेदी केला जाणार आहे.
पालिकेत २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व १९ डिसेंबर या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो. पण मागील साडेतीन वर्षाच्या काळात अनेक कर्मचारी या ध्वजारोहणाला उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले. अनेक कर्मचारी बीएलओ ड्युटीचे कारण पुढे करून कामावर गैरहजर राहतात. ज्यामुळे सामान्य नागरिकांची कामे रखडतात. या प्रकाराची दखल घेत, बीएलओ काम संपल्यानंतर कर्मचार्‍यांच्या कामकाजाच्या तासांबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी पालिका प्रशासन निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिणार आहे. या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शवला आहे.

उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई 
उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर आपल्या भागातील कचरा उचलला गेला नसेल, तर नागरिकांनी ९११२२२८२०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. नवा गॅसिफिकेशन प्रकल्प सोनसडो येथे पूर्णत्वास आलेला आहे. हा प्रकल्प दहा ते पंधरा दिवस सुरू करून त्याची क्षमता चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याचे उद्घाटन पुढील महिनाभराच्या कालावधीत केले जाईल, असेही नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.      

हेही वाचा