पर्वरी फ्लायओव्हरच्या कामासाठी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी

१९ मार्चपर्यंत काही मार्गांवर वाहतूक वळवली जाणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
49 mins ago
पर्वरी फ्लायओव्हरच्या कामासाठी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी

पणजी : पर्वरी फ्लायओव्हरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी वाहतूक वळविणे व काही मार्ग बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १९ मार्चपर्यंत दामियन दे गोवा ते ह्युंडाई शोरूम दरम्यान तसेच ओ’कोकिरो जंक्शन ते डॉ. अनिल डिसिल्वा यांच्या निवासस्थानापर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील काम सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामही हाती घेतले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक वळविण्यात येणाऱ्या ठिकाणी सूचना फलक लावणे बंधनकारक राहणार आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. पुलाच्या काही भागांचे काम प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केले जाणार आहे. वाहतूक बंद असली तरी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवांसाठी एक बाजू खुली ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक वळविण्यात येणाऱ्या ठिकाणी कंत्राटदाराने दोन मार्शल नेमणे बंधनकारक असेल. वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराने आवश्यक ते मार्शल व विशेष पर्यवेक्षक नेमणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पर्वरी फ्लायओव्हरचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करून १९ डिसेंबर रोजी फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस आहे.

हेही वाचा