‘तिरुमला तिरुपती’ संचालकांचा सहकार‌ निबंधकांसमोर माफीनामा

कागदपत्रे केली सादर : तपासणीनंतर सरकारला देणार अहवाल


2 hours ago
‘तिरुमला तिरुपती’ संचालकांचा सहकार‌ निबंधकांसमोर माफीनामा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोटिसा जारी करूनही ऑडिट अहवाल आणि कागदपत्रे सादर केली नसल्याबद्दल तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने पत्राद्वारे माफी मागितली आहे. सोसायटीच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांंनी गोव्यात येऊन सहकार निबंंधकांंची भेट घेतली. त्यांनी सोसायटीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे निबंधकांना सादर केली. यामध्ये ऑडिट अहवाल असण्याची शक्यता आहे. कागदपत्रांंची तपासणी सुरू आहे, अशी माहिती सहकार निबंंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांंनी दिली.
नोटिसा जारी करूनही ऑडिट अहवाल आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नसल्यामुळे सहकार निबंधकांंनी तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची एनओसी रद्द करण्याचा आदेश जारी केला होता. त्यामुळे सोसायटीला गोव्यात १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली मान्यता रद्द झाली. या कारवाईनंतर गोव्याच्या गुंंतवणूकदारांंमध्ये भीती निर्माण झाली. सोसायटीच्या संंचालक मंंडळाने धावपळ सुरू केली. त्यांनी बुधवारी मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ऑडिट अहवाल तसेच सहकार निबंधकांनी मागितलेली कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तिरुमला तिरुपती सोसायटीच्या संचालक मंडळाला भेटीवेळी दिले होते. ऑडिट अहवाल आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सोसायटीचे गोव्याचे प्रतिनिधी, संंचालक तसेच अधिकाऱ्यांंनी सहकार निबंंधकांंची भेट घेऊन कागदपत्रे सादर केली. त्यांनी पत्र लिहून माफीही मागितली आहे, अशी माहिती सहकार निबंंधक आशुतोष आपटे यांनी दिली.
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीला गोव्यात १३ ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द करण्याचा आदेश मंगळवारी जारी झाला होता. या आदेशानंतर राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. पणजीसह इतर शाखांमध्ये ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. कर्मचाऱ्यांकडे सोसायटीविषयी चौकशी करताना बरेच जण विड्रॉवल स्लिप भरताना दिसत होते. तिरुमला तिरुपती म‌ल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडला २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षी नोटिसा जारी केल्या होत्या. या नोटिसींना त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. सोसायटीने ऑडिट अहवालही सादर केला नाही. त्यामुळे एनओसी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सोसायटीने ऑडिट अहवाल आणि अन्य कागदपत्रे सादर केल्यानंतर अार्थिक स्थितीची माहिती सरकारला मिळेल. सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी कागदपत्रे तपासण्यासाठी गेले, त्यावेळीही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य केले नाही. सोसायटीच्या अार्थिक स्थितीविषयी सरकारला कोणतीच माहिती नसल्याने सरकारने मंगळवारी १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द केली. एनओसी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सोसायटीच्या प्रतिनिधी मंडळाने पत्राद्वारे केली. ऑडिट अहवाल तसेच कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर सोसायटीच्या एनओसीविषयी निर्णय घेतला जाईल.
यापूर्वीच्या चुका पुन्हा होणार नाहीत : सोसायटी
यापुढे सोसायटी दरवर्षी ऑडिट अहवाल तसेच कागदपत्रे सादर करेल. यापूर्वी ज्या चुका झाल्या, त्या यापुढे होणार नाहीत. १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी तिरुमला तिरुपती सोसायटीच्या संचालकांनी पत्राद्वारे केली आहे.
कागदपत्राच्या तपासणीनंतर सरकारला देणार अहवाल
गोवा सहकारी सोसायटी कायदा २००१ नुसार, क्रेडिट सोसायटींना दरवर्षी ऑडिट अहवाल सादर करावा लागतो. या अहवालासह गोव्याच्या गुंंतवणुकीविषयी सोसायटीकडे माहिती मागितली होती. ऑडिट अहवालात गोव्याविषयी काय माहिती आहे, त्याची तपासणी केली जाईल. एकंदर व्यवहारापेक्षा गोव्यातील शाखांच्या माहितीवर आमचा भर आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सरकारसमोर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती सहकार निंबधकाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांंनी दिली.


कागदपत्रांची तपासणी करून बुधवारपर्यंत अहवाल : सहकारमंत्री
एनओसी रद्द करण्यात आल्यानंतर तिरुमला तिरुपती को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांची शुक्रवारी भेट घेतली. एनओसी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. सोसायटीने जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांची तपासणी करून अहवाल देण्यास सहकार निबंधकांंना सांगितले आहे. सोमवार अथवा बुधवारपर्यंत मला अहवाल मिळणार आहे. अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.